नेहमी इंग्लंडचा दौराच ठरतो धोनीसाठी वाईट

नेहमी इंग्लंडचा दौराच ठरतो धोनीसाठी वाईट

धोनी

भारताच्या सर्वात यशस्वी कॅप्टन्समध्ये महेंद्रसिंह धोनी गणला जातो. इंग्लंडच्या दौऱ्यातील खराब कामगिरीमुळं पुन्हा एकदा धोनी चर्चेत आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच आयपीएल सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या धोनीला इंग्लंड दौऱ्यात मात्र म्हातारा झाला असल्याची टीका सतत ऐकावी लागली आहे. या दौऱ्यात सतत संथ गतीनं बॅटिंग केल्यामुळं त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे. इतकंच नाही तर आता धोनीनं निवृत्ती स्वीकारावी असाही सल्ला देण्यात येत आहे. वास्तविक इंग्लंडचा दौरा धोनीसाठी नेहमीच वाईट काहीतरी घेऊन येतो असं दिसून आलं आहे. आकडेवारीनुसार तरी असंच दिसून येत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली नेहमीच भारतानं देशात आणि विदेशातही चांगली कामगिरी केली आहे. मात्र, इंग्लंडच्या मैदानात नेहमीच धोनी असफल राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत दोन वेळा टीम इंडियानं दौरा केला आहे. ९ टेस्ट मॅच खेळल्या असून ७ मॅचमध्ये भारत हरला आहे. केवळ १ मॅच जिंकला असून १ मॅच ड्रॉ झाली आहे. तर धोनी स्वतः ८२ पेक्षा अधिक रन्स काढू शकलेला नाही. काय सांगते आकडेवारी –

२०११ मधील दौऱ्यात ४-० नं हरली टीम

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इंग्लंडचा दौरा केला. ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये एक मॅच जिंकू शकले नाहीत. महेंद्र सिंह धोनीनंही ८ इनिंगमध्ये केवळ २ अर्धशतक झळकवलं आहे.

२०१४ चा दौरा सर्वात जास्त विवादात्मक

२०१४ मध्ये धोनी कॅप्टन असताना जंकन फ्लेचर कोच होता. ऑगस्ट २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियानं अतिशय वाईट कामगिरी केली होती. त्यावेळी बीसीसीआयनं शास्त्री यांना टीमचा डायरेक्टर बनवलं होतं. नियुक्तीनंतर शास्त्रीनं आपणच सर्व बघणार सांगितलं होतं. कोचदेखील त्यांनाच रिपोर्ट करणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र धोनीनं या गोष्टीसाठी साफ नकार देऊन टीमचा बॉस फ्लेचरच असेल असं स्पष्ट केलं होतं. यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

२०१८ चा दौरा

या दौऱ्यात धोनी कॅप्टन नसला तरीही अतिशय संथ गतीनं बॅटिंग केल्यामुळं धोनीवर सर्व बाजूनं टीका होत आहे. आता धोनीनं निवृत्ती घ्यावी यासाठीदेखील अनेक ठिकाणी त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

पुढचा वर्ल्डकपही इंग्लंडमध्ये

पुढच्या वर्षी अर्थात २०१९ मध्ये होणारा वर्ल्ड कपदेखील इंग्लंडमध्येच आहे. टीम इंडियाचा कॅप्टन आणि कोच शास्त्री या दोघांनीही धोनी वर्ल्डकपपर्यंत टीममध्ये असणार याची स्पष्टोक्ती दिली होती. पण धोनी सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळं वर्ल्डकपच्या आधीच धोनी निवृत्ती घेणार की, वर्ल्डकपची एखादी मॅचच शेवटची ठरणार हे येणारा काळच ठरवेल.

First Published on: July 19, 2018 6:20 PM
Exit mobile version