चाहत्याची धोनीभक्ती अन् धोनीची राष्ट्रभक्ती…

चाहत्याची धोनीभक्ती अन् धोनीची राष्ट्रभक्ती…

एम एस धोनी

महेंद्रसिंग धोनी. भारतीय क्रिकेटमधील मोठे नाव.भारतीय क्रिकेट धोनीशिवाय पूर्ण होणार नाही.याचे कारण एक क्रिकेटपटू म्हणून धोनी जेवढा मोठा आहे,तेवढाच त्याचा नम्रपणा अनेकांना भावतो.तसेच त्याचे भारतीय आर्मीत दाखल होणे, देशासाठी त्याच्या मनातील निस्सिम देशसेवेचे प्रतिक आहे. त्याचीच प्रचिती हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात आली. या सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत होता.त्यावेळी धोनी विकेटच्या मागे यष्टीरक्षण करताना धोनीचा एक चाहता सुरक्षा रक्षकांचे कवच भेदत अचानक मैदानात आला. त्यामुळे धोनीसहित सर्वच गोंधळून गेले.

काही कळायच्या आत त्या चाहत्याने धोनीच्या पायाशी लोटांगण घातले. पण यावेळी नकळत त्या चाहत्याच्या हातातील भारताचा राष्ट्रध्वज धोनीच्या पायांपर्यंत आला. त्यावेळी चाहत्याची ही चूक धोनीच्या लक्षात आली.त्याने चाहत्याच्या हातातील ध्वज काढून घेत पुन्हा एकदा देशप्रेम प्रथम असल्याचे दाखवून दिले. मैदानातील धोनीच्या या देशप्रेमाबद्दल सगळीकडूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील हा व्हीडियो मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. धोनीचा हा 300 वा टी-20 वा सामना असल्याने त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. 300 सामन्यांसह धोनी भारताकडून सर्वात जास्त टी-20 सामने खेळणारा खेळाडू बनला आहे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

आंतराष्ट्रीय क्रिकेटपटूंना प्रसिद्धीचे एक वलय असते.त्यामुळे त्यांची सुरक्षा तेवढीच महत्वाची असते.परंतु,धोनीच्या चाहत्याने मैदानात येऊन अशा प्रकारे खेळाडूंच्या जवळ येणे ही पहिलीच वेळ नाही.याआधीही चाहत्यांनी खेळाडूंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अचानक मैदानात येणार्‍या अशा चाहत्यांकडून खेळा़डूंच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

First Published on: February 11, 2019 5:20 AM
Exit mobile version