Mary Kom : मेरी तुझे सलाम!

Mary Kom : मेरी तुझे सलाम!

भारताची सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम

पराभूत झाल्याने चेहऱ्यावर आसू, पण त्याचवेळी आतापर्यंतच्या यशाचे समाधान यामुळे हसू, अशीच काहीशी स्थिती होती भारताची सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोमची. मेरीला टोकियो ऑलिम्पिकच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मेरीने जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा अशा सर्वच स्पर्धांमध्ये किमान एकदा तरी सुवर्ण कामगिरी केली आहे. परंतु, ऑलिम्पिकमध्ये यंदाही तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.

आपले हे अखेरचे ऑलिम्पिक असणार आहे, असे टोकियोला रवाना होण्यापूर्वी मेरी म्हणाली होती. त्यामुळे तिची कारकीर्द ही ऑलिम्पिक सुवर्णपदकाविनाच संपणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, ऑलिम्पिक सुवर्णाशिवायही मेरीची कारकीर्द ऐतिहासिक ठरणार यात जराही शंका नाही. चार मुलांची आई झाल्यावर, अनेक दुखापती झाल्यानंतरही वयाच्या ३८ व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची जिद्द ठेवणे ही अजिबातच सोपी गोष्ट नाही.

‘दिल ये जिद्दी है-जिद्दी है, दिल ये जिद्दी है’, हे मेरी कोम या चित्रपटातील लोकप्रिय गाणं! मात्र, हे फक्त गाणं नसून ही मेरीच्या आयुष्याची कहाणी आहे. ईशान्य भारतातील मणिपूर येथील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या मेरीने अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सर्व आव्हानांना ‘फाईट’ दिली. उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या गरीब घरात मेरीचा जन्म झाला. मेरीला सुरुवातीपासूनच अभ्यासापेक्षा खेळांमध्ये जास्त रुची!

१९९८ साली एशियाड स्पर्धेत मणिपूरच्याच डिंको सिंग यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावल्यामुळे मणिपूरमधील बऱ्याच युवकांप्रमाणे १५ वर्षीय मेरीला बॉक्सिंगकडे वळावेसे वाटले. मेरीने २००० साली राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये तिने पदकांचा सपाटा लावला.

मेरीने २००७ साली जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. अनेकांना वाटले, मेरी संपली. मात्र, थांबेल ती मेरी कसली. एकीकडे मुले आणि कुटुंब, तर दुसरीकडे बॉक्सिंग अशी तारेवरची कसरत ती करत होती. तिला पती ओनलरची खूप साथ लाभली. मुलांमुळे माझ्यातील ताकद कमी झाली नाही, तर दुप्पट झाली आहे, हे मेरीला जणू जगाला दाखवून द्यायचे होते.

त्यानंतर २०१३ मध्ये तिने आणखी एका मुलाला जन्म दिला, तर तिने आणि तिच्या पतीने मिळून २०१८ साली एका मुलीला दत्तक घेतले. वैयक्तिक आयुष्यात या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच तिने खेळाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. जागतिक स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण, तर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची कामगिरीही तिने केली आहे. त्यामुळे ‘मेरी तुझे सलाम,’ अशीच आज प्रत्येक भारतीयाची भावना आहे.

First Published on: July 29, 2021 9:56 PM
Exit mobile version