अजिंक्य रहाणेला मास्टर-ब्लास्टर सचिनकडून शुभेच्छा

अजिंक्य रहाणेला मास्टर-ब्लास्टर सचिनकडून शुभेच्छा

सचिन तेंडूलकर आणि अजिंक्य रहाणे

भारतीय क्रिकेटला मुंबईने आजवर अनेक गुणी खेळाडू दिले आहेत. सचिन तेंडूलकर तर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी देवासमान मानला जातो. मुंबईकर सचिनने दुसऱ्या एका मुंबईकर खेळाडूला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा मुंबईकर खेळाडू आहे अजिंक्य रहाणे.

अशाप्रकारे दिल्या शुभेच्छा !

सचिन तेंडूलकरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रहाणेला तिसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने लिहीले आहे की, “मी आतापर्यंत पाहिलेल्या खेळांडूपैकी एका सर्वात मेहनती, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक क्रिकेटपटूला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सदिच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.” अशा शब्दात सचिनने अजिंक्यवर स्तुतीसुमने उधळली.

इंग्लंड दौऱ्याला रहाणे मुकणार

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात अजिंक्य रहाणे जागा मिळवण्यात यावेळी अपयशी ठरलांय. याचे कारण म्हणजे त्याचा सध्याचा फॉर्म. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर कसोटी सामन्यात सेंच्युरी झळकवणारा अजिंक्य हा एकमेव खेळाडू आहे. तरीही निवड समितीच्या या निर्णयाला अजिंक्यने खेळकर वृत्तीने घेतले आहे. आपल्याला मिळालेल्या या वेळाचा चांगला उपयोग करत अजून जोमाने सराव करुन २०१९ च्या विश्वचशकासाठी संघामध्ये जागा मिळवणार असल्याचे त्याने सांगितले.

अजिंक्य रहाणेच्या आतापर्यंतच्या करीयरवर धावता आढावा

मूळचा महाराष्ट्राचा असणाऱ्या अजिंक्य रहाणेने ३ सप्टेंबर,२०११ रोजी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. यानंतर २२ मार्च २०१३ रोजी त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. अजिंक्यने 90 एकदिवसीय सामन्यांत २४ अर्धशतक आणि ३ शतकांसह २,९६२ रन केले आहेत. तसेच कसोटी सामन्यांत १२ अर्धशतक आणि ९ शतकांसह २,८८३ रन केले आहेत. २०१८ आयपीएलमध्ये रहाणेने राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती.

First Published on: June 6, 2018 1:18 PM
Exit mobile version