सक्षम, न्यू परशुराम क्रीडा मंडळाची आगेकूच

सक्षम, न्यू परशुराम क्रीडा मंडळाची आगेकूच

दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स क्लब, न्यू परशुराम क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, सक्षम क्रीडा मंडळ या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील ज्युनियर गटाची दुसरी फेरी गाठली आहे.

नायगाव येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणात सुरू झालेल्या या स्पर्धेत दादोजी कोंडदेवने चुरशीच्या लढतीत गोल्फादेवी सेवा मंडळाचा ४८-३७ असा पराभव केला. प्रज्ञेश पाटील, प्रणय पाटील यांच्या आक्रमक चढाया आणि शुभम घाडगेच्या उत्तम पकडीमुळे या सामन्याच्या मध्यंतराला गोल्फादेवीकडे २७-१३ अशी भक्कम आघाडी होती. मध्यंतरानंतर गोल्फादेवीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण दादोजी कोंडदेवने चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला. दुसर्‍या डावात दादोजी कोंडदेवच्या अनिकेत जाधव, प्रशांत पाटील या चढाईपटूंनी, तर यश पाटील, प्रणय बांद्रे या बचावपटूंनी अप्रतिम खेळ केला.

दुसरीकडे न्यू परशुरामने गुड मॉर्निगला ३७-३१ असे नमवत आगेकूच केली. ओमकार परब, विनायक पवार यांच्या दमदार खेळाच्या जोरावर मध्यंतराला २३-९ अशी आघाडी मिळवणार्‍या न्यू परशुरामाला उत्तरार्धात मात्र गुड मॉर्निंगने झुंज दिली. सिद्धेश पाटील, आर्य चव्हाण यांनी गुड मॉर्निंगकडून चांगली लढत दिली. साऊथ कॅनराने मध्यंतरातील १३-१४ अशा पिछाडीवरून बंड्या मारुतीवर ३६-२१ अशी मात केली. अमन शेख, किरण गर्जे, गणेश सिंग यांनी साऊथ कॅनराच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

सक्षम मंडळाने विजय क्लबला ४०-३३ असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली. या सामन्यात विश्रांतीला सक्षमने १७-१५ अशी आघाडी घेतली होती. प्रथमेश कुंभार, हर्ष जाधव, जतीन भोसले सक्षमकडून, तर रोशन थापा, अभिषेक रुपनार, संकेत माने विजय क्लबकडून उत्कृष्ट खेळले. सुनील स्पोर्ट्स क्लबने बालगोपाल मित्र मंडळाला ४४-२९ असे पराभूत करत आगेकूच केली. सुनील स्पोर्ट्स क्लबकडून हितेश सावंत, दीपेश परब उत्तम खेळले. गणेश बेंगर, करण जैसवालच्या उत्तम खेळाच्या जोरावर शताब्दी स्पोर्ट्स क्लबने एकवीरा मातावर ५२-४२ असा विजय मिळवला.

पहिल्या फेरीचे इतर निकाल : १) यंग प्रभादेवी क्रीडा मंडळ विजयी वि. हौशीबाल क्रीडा मंडळ (४९-२४); २) श्री राम क्रीडा विश्वस्त मंडळ विजयी वि. सात आसरा स्पोर्ट्स क्लब (५८-१४); ३) जय दत्तगुरु क्रीडा मंडळ विजयी वि. नवनाथ क्रीडा मंडळ (५४-१९); ४) विहंग क्रीडा मंडळ विजयी वि. वंदे मातरम क्रीडा मंडळ (३९-२७).

First Published on: November 16, 2019 5:19 AM
Exit mobile version