मुंबईची दिल्लीत मर्दुमकी; दोन्ही पांड्यांनी धुतलं!

मुंबईची दिल्लीत मर्दुमकी; दोन्ही पांड्यांनी धुतलं!

हार्दिक पांड्या कृणाल पांड्या

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये सुरूवातीला अडखळत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला आता चांगलाच सूर गवसला आहे. आपल्या नवव्या मॅचमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं दिल्लीला हरवत पॉइंट टेबलमध्ये २ गुणांची कमाई करून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर हा सामना गमावल्यामुळे दिल्लीची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या सलामीच्या जोडीने धमाकेदार अर्धशतकी सलामी दिल्यानंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करत मुंबईला १६८ धावांपर्यंत मजस मारून दिली. तेव्हाच हा सामना रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.

टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टन रोहित शर्मा (३०) आणि क्विंटन डि कॉक(३५) या दोघांनी सार्थ ठरवला. पॉवर प्लेच्या ६ ओव्हर्समध्ये या दोघांनी ५७ धावा कुटल्या. मिश्राच्या एका न कळणाऱ्या बॉलवर रोहित फसला आणि क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर आलेला कटिंग फक्त २ रनांची भर घालून माघारी परतला. धोकादायक वाटणारा डिकॉक चुकीच्या कॉलमुळए रन आऊट झाला तेव्हा मुंबईच्या १० ओव्हरमध्ये फक्त ७४ धावा झाल्या होत्या. आता डाव गडगडतोय की काय असं वाटत असतानाच सूर्यकुमार यादवने सावध खेळी करत पडझड थांबवली. मात्र, १५ ओव्हरपर्यंत डाव ओढून नेल्यानंतर तोही २७ बॉलमध्ये २६ रन करून माघारी परतला. त्यावेळी मुंबईचा स्कोअर होता १०४ रन. दीडशेचा तरी टप्पा पूर्ण होणार का? असं वाटत असतानाच हार्दिक पांड्या(३२) आणि कृणाल पांड्या(३७) या दोघांची जोडी जमली. त्यांनी या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३२ बॉलमध्ये ५४ रनांची पार्टनरशिप करत संघाला १६८ पर्यंत नेऊन ठेवलं.

मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीच्या जोडीनं सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण ठेवलं होतं. शिखर धवन त्याच्या नैसर्गिक पद्धतीने बॉलर्सवर तुटून पडला. ६ ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्येच दिल्ली कॅपिटल्सच्या ४८ धावा झाल्या होत्या. तेही एकही विकेट न गमावता. मात्र, स्टॅटेजिक टाईम आऊट झाल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक वाटणाऱ्या शिखर धवनचा अडसर राहुल चहरनं दूर केला. आपल्याच पुढच्या ओव्हरमध्ये चहरनं सावध खेळणाऱ्या पृथ्वी शॉलाही(२४ बॉल २० रन) माघारी धाडलं. तेव्हा दिल्लीचा स्कोअर होता ५९ रन २ विकेट! आता चहर एकीकडून विकेट घेत असताना पांड्या तरी कसा शांत राहणार? पांड्यानंही दहाव्या ओव्हरमध्ये दिल्लीचा स्कोअर ६१ असताना मुन्रोला क्लीन बोल्ड केलं आणि दिल्ली अडचणीत आली.

टीम अडचणीत आलेली असताना ज्याच्याकडे आशेनं पाहिलं जात होतं, त्या श्रेयस अय्यरनंही निराशाच केली. अवघ्या ३ रनांवर चहरनं अय्यरचा त्रिफळा उडवला आणि दिल्ली पराभवाच्या दिशेनं जाऊ लागली.

First Published on: April 18, 2019 11:26 PM
Exit mobile version