मुंबई ज्युनिअर निवड समितीचा नवा घोळ

मुंबई ज्युनिअर निवड समितीचा नवा घोळ

मागील काही वर्षांपासून मुंबई क्रिकेटमधील विविध वयोगटांच्या संघ निवडीत बरेच घोळ घालण्यात आले आहेत. आता मागील निवडसमितीच्या गोंधळाची परंपरा या समितीने कायम ठेवली आहे. संभाव्य खेळाडूंच्या यादीत नसलेल्या आणि सुमार कामगिरी करणार्‍या अर्जुन दाणीला, तर जन्मतारखेच्या घोळात अडकलेल्या जुगराज मेहताला सोळा वर्षाखालील संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान देऊन मंदार फडके यांच्या ज्युनिअर निवड समितीने नवा घोळ घातला आहे.

सोळा वर्षाखालील क्रिकेटपटूंच्या संघ निवडीमध्ये वशिलेबाजी आणि लॉबिंग होत असल्याचं वृत्त ’महानगर’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर इतर प्रसिद्धी माध्यमांनी ही यावर प्रकाश टाकला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून मंदार फडके यांच्या निवड समितीने गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही गोंधळ घालत आहे. सोळा वर्षाखालील मुलांच्या संघात सहा खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र झाल्याने त्याजागी नव्या खेळाडूंची निवड करण्यात येणार होती. प्रत्यक्षात संभाव्य खेळाडूंच्या यादी व्यतिरिक्त काही खेळाडू राखीव ठेवण्याची पद्धत आहे.

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अर्जुन दाणीचा समावेश होऊ शकला नव्हता. तसेच त्याची कामगिरी खूपच सुमार होत असल्यामुळे तो मुंबई संघाच्या आसपासही स्थान मिळू शकत नव्हता. मात्र, खेळाडू अपात्र ठरल्याचे निमित्त साधून अर्जुन दाणीला संघात आणण्यासाठी घाट घालण्यात आला. निवड समितीच्या चार सदस्यांपैकी अध्यक्ष मंदार फडके आणि मयुर कद्रेकर या दोनच सदस्यांनी या खेळाडूंची निवड केली. या निवडीच्या वेळी पियुष सोनेजी गैरहजर होते. माजी क्रिकेटपटू अमित दाणी यांचा मुलगा असलेल्या अर्जुनला वडिलांच्या लॉबिंगमुळे कमालीचे झुकते माप दिले जात आहे. फडके, कद्रेकर आणि दाणी हे एकाच ऑईल कंपनीत नोकरी करतात.

जुगराज मेहताच्या जन्मतारखेच्या दाखल्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ’महानगर’ने या संदर्भातील वृत्त प्रसारित केल्यानंतर मुंबईच्या ज्युनिअर क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली, पण त्यानंतरही पाच खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अर्जुन दाणी, जुगराज मेहता, प्रेम नायक, दिव्य शहा आणि वरूण राव यांचा समावेश आहे. मुंबई क्रिकेटमध्ये सध्या क्रिकेट विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि मुंबईचे क्रिकेट व्यवस्थित खेळले जावे यासाठी ज्येष्ठ क्रिकेटपटूंची समिती कार्यरत आहे. दिलीप वेंगसरकर हे या समितीचे प्रमुख आहेत. ज्युनिअर खेळाडूंच्या वशिल्याने करण्यात आलेल्या या घुसखोरीबद्दल आणि जुगराज मेहताच्या जन्मतारखेच्या घोळाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून मंदार फडके यांच्या समितीने वशिलेबाजीच्याच मागच्या पानावरून पुढे जाणे पसंत केले आहे. याबाबतीत दिलीप वेंगसरकर आणि उमेश खानविलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

ज्युनियर निवड समितीमध्ये गेली दोन वर्ष संघ निवडीच्या वेळी घोळ घातला जात आहे. या घोळाबाबतीत मुंबई क्रिकेटबद्दल कळकळ असलेल्या वेंगसरकर, संजय पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंकडून खेळाडू आणि पालकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, मुंबई क्रिकेटमध्ये सध्या निर्णय प्रक्रियेची वानवा आणि पदाधिकार्‍यांमधील विस्कळीतपणा यामुळे घुसखोरी करणार्‍या खेळाडूंचा आणि त्यांच्या पालकांचे चांगलेच फावले असल्याची चर्चा मुंबई क्रिकेटमध्ये सुरू आहे.

First Published on: August 7, 2019 5:23 AM
Exit mobile version