वन-डेतील खराब कामगिरी, हा फक्त लोकांचा समज !

वन-डेतील खराब कामगिरी, हा फक्त लोकांचा समज !

रविचंद्रन अश्विनचे मत

चायनामन कुलदीप यादव आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल हे दोघे मागील १-२ वर्षात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रमुख फिरकीपटू म्हणून समोर आले आहेत. या दोघांच्या चांगल्या कामगिरीमुळे ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे. अश्विनने आपला अखेरचा एकदिवसीय सामना जून २०१७ मध्ये खेळला होता. मात्र, माझी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी वाईट नाही, असे अश्विन म्हणाला.

भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात स्थान का मिळत नाही असे विचारले असता अश्विन म्हणाला, मला माहित नाही. लोकांचा असा समज आहे की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये माझी कामगिरी चांगली नाही, मात्र तसे अजिबातच नाही. आता लोकांना वाटते की एकदिवसीय क्रिकेटमध्ये लेगस्पिनर, चायनामन स्पिनर हवाच असतो आणि त्यामुळेच मी संघाबाहेर आहे. मी माझ्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात (वेस्ट इंडिजविरुद्ध) २८ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे मी जेव्हा मागे वळून माझ्या कारकिर्दीकडे पाहीन, तेव्हा माझी मेहनत कमी पडली म्हणून नाही तर आता संघाला वेगळ्या गोष्टींची गरज आहे म्हणून मी संघाबाहेर आहे असा विचार करेन, असे अश्विन म्हणाला.

काही दिवसांत सुरु होणार्‍या आयपीएलमुळे विश्वचषकाआधी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. याबाबत अश्विन म्हणाला, क्रिकेटपटू म्हणून तुम्ही फार पुढचा विचार करू शकत नाही. क्रिकेटपटू किंवा कोणताही खेळाडू आज काय करायचे यावर लक्ष केंद्रित करतो. आयपीएल फ्रेंचायझींनी तुम्हाला संघात घेण्यासाठी खूप पैसे दिलेले असतात. ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असते. मात्र, फिटनेसबाबत तुम्ही थोडाफार विचार करत राहणार कारण या विषयावर खूप चर्चा होत आहे. पण, सर्वच खेळाडू जबाबदार आहेत आणि त्यांना आपला फिटनेस कसा राखायचा हे माहित आहे. कोणालाही विश्वचषकाला दुखापतीमुळे मुकायला आवडणार नाही, असे अश्विन म्हणाला.

First Published on: March 18, 2019 4:06 AM
Exit mobile version