पंत, माझ्यात स्पर्धा नाही!

पंत, माझ्यात स्पर्धा नाही!

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. भारतीय संघ त्याच्या जागी युवा रिषभ पंतला जास्तीजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्याला या संधीचा फारसा फायदा घेता आला नाही. त्यामुळे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाची धुरा लोकेश राहुलने सांभाळली आहे.

परंतु, राहुल फार काळ फलंदाज आणि यष्टीरक्षण या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडू शकेल असे बर्‍याच क्रिकेट समीक्षकांना वाटत नाही. त्यामुळे भारताने यष्टीरक्षक म्हणून पंत किंवा संजू सॅमसनचा विचार केला पाहिजे असे मत व्यक्त होत आहे. मात्र, माझ्यात आणि पंतमध्ये स्पर्धा नाही, असे सॅमसनने स्पष्ट केले आहे.

माझ्यात आणि रिषभमध्ये स्पर्धा नाही. तुमची इतरांशी स्पर्धा आहे आणि तुम्ही इतर खेळाडू काय करत आहेत याकडे सतत लक्ष देत असाल, तर तुम्ही फार यशस्वी होऊ शकणार नाही. आयपीएलमध्ये रिषभ आणि मी दिल्ली डेअरडेविल्स संघातून एकत्रच सुरुवात केली होती. आम्ही बराच वेळ एकत्र घालवायचो. आम्ही चांगले मित्र आहोत.

रिषभ हा प्रतिभावान खेळाडू आहे. आम्हाला एकमेकांसोबत खेळायला आवडते. लोक माझ्यात आणि रिषभमध्ये एका जागेसाठी स्पर्धा आहे म्हणतात. मात्र, आम्ही एकत्र खेळू शकतो. आम्ही एकत्र मिळून चांगले खेळतो. आम्ही गोलंदाजांवर दबाव टाकतो. त्यामुळे मी रिषभकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाही, असे सॅमसनने एका मुलाखतीत सांगितले.

First Published on: June 9, 2020 5:30 AM
Exit mobile version