पंत, शंकरने निराशा केली

पंत, शंकरने निराशा केली

संजय मांजरेकरची टीका

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे एकदिवसीय सामने हे विश्वचषकाआधी भारताचे अखेरचे आंतरराष्ट्रीय सामने असल्याने या सामन्यांमध्ये युवा खेळाडू रिषभ पंत आणि विजय शंकर यांना संधी देण्यात आली. शंकरने सुरुवातीच्या काही सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. मात्र, अखेरच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याला आणि पंतलाही चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे या सामन्यानंतर भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकरने या दोघांवर टीका करणारे एक ट्विट केले.

पंत आणि शंकरने खूप निराशा केली. त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची खूप चांगली संधी होती. शंकरकडे मोठे फटके मारण्याची क्षमता असली तरी तो पंत नाही. त्यामुळे त्याने मैदानालगतच फटके मारून आपला स्ट्राईक रेट कसा वाढवता येईल हे आपल्या कर्णधाराकडून (विराट कोहली) शिकले पाहिजे, असे मांजरेकरने ट्विटमध्ये लिहिले होते.

पाचव्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची २ बाद ६८ अशी अवस्था होती आणि चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतला खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याला १६ धावाच करता आल्या. पंत बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या शंकरनेही १६ धावाच केल्या.

First Published on: March 15, 2019 4:26 AM
Exit mobile version