भारत – श्रीलंका कसोटीत खेळपट्टी फिक्सिंग?

भारत – श्रीलंका कसोटीत खेळपट्टी फिक्सिंग?

(फोटो प्रातिनिधिक आहे)

वृत्तवाहिनीच्या दाव्यामुळे क्रिकेटविश्व हादरले

भारतीय क्रिकेट संघाने २०१७ सालात खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टीबाबत ‘फिक्सिंग’ करण्यात आली होती असा दावा अल जझिरा या वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीच्या दाव्यामुळे क्रिकेटविश्व हादरले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्वरीत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर शिखर संघटनेकडून तपास सुरू असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’चं धोरण अवलंबिलं आहे.

‘आयसीसी’कडून चौकशी सुरु

खेळपट्टी फिक्सिंगच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अल जझिराने भारत-श्रीलंका(जुलै २०१७), भारत–ऑस्ट्रेलिया(मार्च २०१७) आणि भारत–इंग्लंड(डिसेंबर २०१७) दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यांवर संशय व्यक्त केला आहे. यातील गॉल व चेन्नई कसोटीत भारताने बाजी मारली होती, तर रांची कसोटी ड्रॉ झाली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीसी’ने चौकशी सुरु केल्याचे ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. अल जझिराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रॉबिन मॉरिस हा प्रथम श्रेणीतील भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन रजासोबत दिसत आहे. याचवेळी हे पीच फिक्सिंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, रॉबिन मॉरिसने हे आरोप फेटाळले आहे. ‘आपल्याला जाणून बुजून या प्रकरणामध्ये अडकवले जात आहे’ असा दावा मॉरिसने केला आहे.

दोषी आढळल्यास कारवाई

४२ प्रथम श्रेणी आणि ५१ लिस्ट ए सामने खेळलेला रॉबिन मॉरिसचा सध्या ‘बीसीसीआय’च्या कुठल्याच योजनेत समावेश नाही. मात्र, स्थानिक क्रिकेटपटूंच्या पेन्शन योजनेत रॉबिन मॉरिसचा समावेश आहे. तसेच रॉबिन ‘आयसीसी’च्या तपासात दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे ‘बीसीसीआय’च्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. त्याचबरोबर त्याचे मानधन बंद करण्याचा निर्णय देखील ‘बीसीसीआय’ घेऊ शकते असे सांगण्यात आले आहे.

First Published on: May 28, 2018 6:33 AM
Exit mobile version