IND vs ENG 1st ODI : भारताची विजयी सुरुवात; पदार्पणात प्रसिध, कृणालची चमक  

IND vs ENG 1st ODI : भारताची विजयी सुरुवात; पदार्पणात प्रसिध, कृणालची चमक  

राहुल आणि कृणाल पांड्या

फलंदाजांच्या अर्धशतकी चौकारानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून प्रसिध कृष्णा आणि कृणाल पांड्या यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. कृणालने फलंदाजीत ३१ चेंडूत नाबाद ५८ धावा, तर गोलंदाजीत प्रसिधने ५४ धावांत ४ विकेट घेत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यादरम्यान भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

धवनचे शतक हुकले

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी ६४ धावांची सलामी दिल्यावर रोहितला (२८) बेन स्टोक्सने बाद केले. मात्र, धवन आणि कर्णधार विराट कोहलीने १०५ धावांची भागीदारी रचली. मार्क वूडने कोहलीला (५६) बाद करत ही जोडी फोडली. तर धवनचे शतक केवळ दोन धावांनी हुकले. त्याला ९८ धावांवर स्टोक्सने माघारी पाठवले. यानंतर अखेरच्या षटकांत राहुल (४३ चेंडूत नाबाद ६२) आणि कृणाल (३१ चेंडूत नाबाद ५८) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने ५० षटकांत ५ बाद ३१७ अशी धावसंख्या उभारली.

प्रसिध, शार्दूलचा भेदक मारा

३१८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो (९४) आणि जेसन रॉय (४६) यांनी १४.२ षटकांतच १३५ धावा फटकावल्या. मात्र, प्रसिध कृष्णाने रॉय आणि बेन स्टोक्स यांना झटपट माघारी पाठवले. तर शार्दूल ठाकूरने बेअरस्टो, मॉर्गन आणि जॉस बटलर यांना बाद केले. यानंतर मोईन अली (३०) वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांना २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. अखेर इंग्लंडचा डाव ४२.१ षटकांत २५१ धावांत आटोपला.

First Published on: March 23, 2021 10:07 PM
Exit mobile version