बदलापूरची खो-खोतील सुवर्णकन्या प्रियंका भोपी

बदलापूरची खो-खोतील सुवर्णकन्या प्रियंका भोपी

बदलापूरची खो-खोतील सुवर्णकन्या प्रियंका भोपी

खो-खो या खेळामध्ये बदलापूरची सुवर्णकन्या प्रियंका भोपी केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण भारतात आपली छाप पाडत आहे. बदलापूरमधील एका घोट्या गावातून प्रियंकाचा संघर्ष सुरु झाला, जो अजूनही सुरू आहे. नरेंद्र मेंगल आणि म्हस्कर सर यांच्या मार्गदर्शनात शिवभक्त विद्यामंदिर येथे ती खो-खोचा सराव करते. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह आंतरविद्यापीठीय स्पर्धेत प्रियंकाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. कोणत्याही स्तरावरील स्पर्धेत आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणण्यात प्रियंकाचा हातखंडा आहे. काही जणांनी तर तिला ‘नॉट आऊट’ असे नाव ठेवले आहे.

प्रियंकाच्या या यशामागे मोठा संघर्ष आहे. बदलापूरहून संध्याकाळच्या सत्रात होणाऱ्या खो-खो स्पर्धा खेळण्यासाठी इतर ठिकाणी जाणे सोपे नाही. त्यातच तिची घरची आर्थिक परिस्थिती बिकट! त्यामुळे स्पर्धेसाठी लागणारा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. परंतु, असे असतानाही मैदान गाठून मेहनत घेणे तिने सोडले नाही. अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या प्रियंकाने २०१७ मध्ये सर्वोत्तम महिला खो-खोपटूला मिळणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावला होता. ठाण्याला सहा वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम स्थान मिळवून देण्यात प्रियंकाने महत्वाची भूमिका बजावली आहे.

दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक, तसेच इंग्लंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे आणि नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत ७ मिनिटे नाबाद राहत राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळवणे ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे प्रियंका सांगते. प्रियंकाने तिचे महाविद्यालयीन शिक्षण एस. एस. टी महाविद्यालय, उल्हासनगर येथून पूर्ण केले. तिच्या कामगिरीमुळे एस. एस. टी महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम स्थान मिळवण्यात यश आले. तसचे मुंबई विद्यापीठ क्रॉस कंट्री ॲथलेटिक्स स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे सरकारने तिच्यासारख्या गुणी खेळाडूला शासकीय सेवेत योग्य ती नोकरी देऊन तिचा सन्मान करणे गरजेचे आहे.

First Published on: June 5, 2021 7:11 PM
Exit mobile version