राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या सांभाळेल; सौरव गांगुलीला विश्वास

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या सांभाळेल; सौरव गांगुलीला विश्वास

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची मागील वर्षाच्या अखेरीस भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर भारताने मायदेशात सर्व जिंकले, पण परदेशात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर काही क्रिकेट तज्ज्ञांनी सांगितले की, द्रविडला परदेशात प्रशिक्षक म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविडच्या कामगिरीचे समर्थन केले आहे. तसंच, राहुल द्रविडकडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी सर्व गुण आहेत, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याच्या माजी संघ-सहकाऱ्याची स्तुती केली.

‘‘मी आणि राहुल अनेक वर्षे भारतीय संघातून एकत्रित खेळलो. राहुल तेव्हापासूनच खेळाप्रति सतर्क आणि निष्ठावंत आहे. तो खेळाचे बारकावे जाणतो. आता फरक इतकाच आहे की, त्याला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची गरज नाही. त्या वेळी त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना केला आहे. त्याने बराच काळ आपली भूमिका चोखपणे पार पाडली. आता प्रशिक्षक म्हणूनही तो आपली भूमिका चांगल्या पद्धतीने बजावेल याची मला खात्री आहे,’’ असे गांगुली म्हणाला.

‘‘प्रत्येकाप्रमाणे राहुलही चुका करेल. मात्र, तुम्ही योग्य दिशेने मेहनत घेता, तेव्हा इतरांच्या तुलनेत अधिक यश प्राप्त होते,’’ असेही गांगुलीने नमूद केले. द्रविड आणि शास्त्री या भारताच्या आजी-माजी प्रशिक्षकांमध्ये तुलना करणे योग्य ठरणार नाही, असे गांगुलीला वाटते. ‘‘रवी आणि राहुल यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. एक जण निडरपणे बोलतो आणि वावरतो, तर दुसरा दिग्गज खेळाडू असूनही आपले काम अगदी शांतपणे करतो. मात्र, दोघेही तितकेच यशस्वी आहेत,’’ असे गांगुली म्हणाला

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष गांगुलीने द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि त्यांच्या जागी द्रविडची निवड करण्यात आली.


हेही वाचा – पृथ्वी शॉची फ्लॉप खेळी; आयपीएलमध्ये संघात टिकून राहणं अवघड

First Published on: April 4, 2022 3:12 PM
Exit mobile version