रणजी अंतिम सामना

रणजी अंतिम सामना

रणजी

रणजी चषकाच्या अंतिम लढतीत विजयाचे पारडे चौथ्या दिवसअखेरीस गतवेळच्या विजेत्या यजमान विदर्भाच्या बाजूने झुकले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाचा मानकरी ठरला तो आदित्य सरवटे. अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवताना त्याने मोक्याच्या क्षणी ४९ धावा फटकाल्यामुळे विदर्भाने दुसर्‍या डावात २०० धावांचा टप्पा गाठला. यंदाच्या रणजी मोसमात बळींचे अर्धशतक (५० विकेट) पार करणार्‍या सरवटेने दुसर्‍या डावात चेतेश्वर पुजाराला शून्यावरच बाद केले, हाच सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार्‍या पुजाराला रणजी अंतिम फेरीत आपली छाप पाडता आली नाही. या सामन्याच्या दोन्ही डावांत मिळून तो १६ चेंडू खेळला आणि अवघी १ धाव करून माघारी परतला.

हा सामना जिंकण्यासाठी मिळालेले २०६ धावांचे आव्हान व्हीसीएच्या मंद खेळपट्टीवर पार करणे सोपे नाही. डावखुरा फिरकीपटू सरवटेने १३ धावांत ३ मोहरे टिपल्यामुळे पाहुण्या सौराष्ट्राची ३ बाद २३ अशी डळमळीत सुरुवात झाली, तर उमेश यादवसमोर अर्पित वासावडाची डाळ शिजली नाही. पुजारानंतर सौराष्ट्राची मदार होती शेल्डन जॅक्सनवर, पण तो फटकेबाजीच्या नादात पॅव्हेलियनमध्ये परतला. निम्मा संघ ५५ धावांतच गारद झाल्यामुळे सौराष्ट्राच्या गोटात चिंतेचे वातावरण होते.

त्याआधी विदर्भाची दुसर्‍या डावाच्या सुरुवातीला घसरगुंडी उडाली होती. ७३ धावांतच त्यांचा अर्धा संघ बाद झाला होता, पण त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी १२७ धावांची बहुमोल भर घातल्यामुळे विदर्भाचे द्विशतक फलकावर झळकले. त्यात ४९ धावा करणार्‍या सरवटेचा मोठा वाटा होता. सौराष्ट्राचा फिरकीपटू धर्मेंद्रसिंह जाडेजाने ६ विकेट काढून महत्वाची भूमिका पार पाडली.

संक्षिप्त धावफलक –

विदर्भ : ३१२ आणि २०० (आदित्य सरवटे ४९; धर्मेंद्रसिंह जाडेजा ६/९६) वि. सौराष्ट्र : ३०७ आणि ५ बाद ५८ (विश्वराज जाडेजा खेळत आहे २३, स्नेल पटेल १२, पुजारा ०; सरवटे ३/१३).

First Published on: February 7, 2019 4:46 AM
Exit mobile version