चेन्नईचा विजयवारू बंगळुरूत अडखळला; ‘स्टेन’गननं केलं काम तमाम!

चेन्नईचा विजयवारू बंगळुरूत अडखळला; ‘स्टेन’गननं केलं काम तमाम!

आरसीबी वि. सीएसके सामन्यात डेल स्टेननं सुरेश रैनाचा असा त्रिफळा उडवला!

आयपीएलच्या यंदाच्या सीजनच्या सुरुवातीपासूनच तुफान फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा विजयवारू अखेर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या घरच्या मैदानावर अर्थात बंगळुरूमध्ये अडखळला. नुसताच अडखळला नाही, तर कोलांटउड्या खाऊन पार तोंडावर पडला. मात्र असं असलं, तरी कॅप्टन धोनीनं सामना शेवटच्या बॉल पर्यंत नेला. शेवटच्या बॉलवर २ रन करायचे असताना शार्दूल ठाकूर रनआऊट झाला आणि आरसीबीनं एकच जल्लोष केला. आरसीबीनं ठेवलेल्या १६२ रनांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची बॅटिंग कधी नव्हे इतकी कमकुत दिसून आली. टॉप ऑर्डरनं अक्षरश: आरसीबीच्या बॉलर्सपुढे लोटांगण घातल्यामुळे मिडल ऑर्डर अर्थात धोनीवर प्रेशर आलं आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला! ट्वेंटी ट्वेंटीमध्ये वनडेच्या स्ट्राईक रेटने खेळावं लागल्यामुळे रनरेटचं प्रेशर वाढत गेलं आणि परिणामी चेन्नईला पराभव पत्करावा लागला. यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली ती डेल स्टेननं आणि तीही पहिल्याच ओव्हरमध्ये!

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा घेतलेला निर्णय चेन्नईसाठी फायदेशीर ठरला. तिसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीचा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला कॅप्टन विराट कोहलीलाच चहरनं माघारी धाडलं. विराट कोहली आऊट झाल्यानंतर पार्थिव पटेलनं सूत्र हाती घेतली. एबी डिव्हिलियर्ससोबत दुसऱ्या विकेटसाठी पार्थिवनं ४७ रनांची भागीदारी केली. मात्र, जडेजाच्या बॉलिंगवर सातव्या ओव्हरमघ्ये एबीडी डुप्लेसिसकडे कॅच देऊन तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर आलेल्या अक्षदीप नाथसोबत पार्थिवनं पुन्हा ४१ रनांची भागीदारी केली पण जाडेजानंच नाथचा अडसर दूर केला. मार्कस स्टॉयनिससोबत देखील पार्थिवनं भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. त्याचं अर्धशतक देखील पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर लगेच ब्राव्होनं त्याला वॉटसनकडे कॅच द्यायला भाग पाडलं. ३७ बॉलमध्ये ५३ रन करणाऱ्या पार्थिवनं २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. सोळाव्या ओव्हरमध्ये पार्थिव आऊट झाला तेव्हा आरसीबीचा स्कोअर होता १२४ रनांवर ४ विकेट. स्टॉयनिस आणि मोईन अलीनं शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, त्यांना स्कोअरबोर्डवर फारशी भर घालता आली नाही. २० ओव्हर संपल्या तेव्हा आरसीबीचा स्कोअर झाला होता १६१!

१६२ रनांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये डेल स्टेननं धोकादायक शेन वॉटसन आणि सुरेश रैना या दोघांना माघारी धाडलं. सुरेश रैनाची विकेट काढणारा स्टेनचा यॉर्कर मैदानातल्या सगळ्यांचीच वाहवा मिळवून गेला! चेन्नईच्या बॅट्समन्सची हाराकिरी इतक्यात थांबली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये फॉर्मात असलेला सलामीवीर फॅफ डूप्लेसिस देखील १५ बॉलमध्ये अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. उमेश यादवच्या बॉलिंगवर एबीडीनं त्याचा झेल टिपला. नंतर आलेल्या केदार जाधवसोबत रायुडू डाव सावरत असल्याचं दिसत असतानाच उमेश यादवनं सहाव्या ओव्हरमध्ये केदार जाधवलाही(९) डिव्हिलियर्सकडेच कॅच द्यायला भाग पाडलं. ६ ओव्हर्सचा पॉवरप्ले संपला, तेव्हा चेन्नईची अवस्था होती ३२ रनांवर ४ विकेट!

केदार आऊट झाल्यानंतर मैदानावर उतरला तो सगळ्यांचा लाडका माही अर्थात कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी. टॉप ऑर्डरनं निराशा केल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा धोनीवर खिळल्या होत्या. मात्र, रनरेटचं प्रेशर हळूहळू वाढू लागलं होतं. मात्र शेवटच्या ५ ओव्हरमध्ये कॅप्टन धोनीनं जोरदार फटकेबाजी करत जवळपास अशक्य वाटणारं आव्हान हाताशी आणून ठेवलं होतं. उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये २६ रन आवश्यक होते. धोनीनं ३ षटकार, १ चौकार आणि एक दुहेरी असे ५ बॉलमध्ये २४ रन वसूल केले. शेवटचा बॉल खेळण्यासाठी धोनी स्वत: स्ट्राइकवर होता. पण त्याचा बॉल मिस झाला. रन काढण्यासाठी तो धावला देखील. पण समोरचा शार्दूल ठाकूर क्रीझमध्ये पोहोचण्याआधीच पार्थिव पटेलनं डायरेक्ट हिटने बेल्स उडवल्या होत्या. धोनीने अवघ्या ४८ बॉलमध्ये ८४ धावा फटकावल्या. पण त्याची एकांगी लढत अखेर अपयशी ठरली.

First Published on: April 21, 2019 11:51 PM
Exit mobile version