IPL 2021 : रॉबिन उथप्पा खेळणार आता ‘या’ संघाकडून 

IPL 2021 : रॉबिन उथप्पा खेळणार आता ‘या’ संघाकडून 

महेंद्रसिंग धोनी आणि रॉबिन उथप्पा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचे आणि कोणत्या खेळाडूंना संघातून बाहेर करायचे, हे ठरवण्यासाठी बुधवारपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. त्यानुसार या स्पर्धेतील आठही संघांनी आपण रिटेन केलेल्या आणि संघातून बाहेर केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही संघांना खेळाडूंची आदलाबदल करण्याची मुभा आहे. याचा आता राजस्थान रॉयल्स संघाने फायदा घेतला असून त्यांनी फलंदाज रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी आयपीएल मोसमात उथप्पा हा महेंद्रसिंग धोनीच्या सीएसके संघाकडून खेळताना दिसेल.

मागील मोसमात निराशाजनक कामगिरी

२०२० आयपीएल खेळाडू लिलावात उथप्पाला राजस्थान संघाने खरेदी केली होते. मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत तो १२ सामने खेळला. त्याला केवळ १९६ धावाच करता आल्या आणि यात एकाही अर्धशतकाचा समावेश होता. मात्र, आता राजस्थानने त्याला चेन्नईच्या संघात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रॉबिनने संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो,’ असे राजस्थान रॉयल्सचे सीओओ जेक मॅक्रम म्हणाले.

उथप्पा चांगल्या फॉर्मात

चेन्नई सुपर किंग्स ही उथप्पाची आयपीएलमधील सहावी फ्रेंचायझी असेल. याआधी तो मुंबई इंडियन्स (२००८), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२००९-१०), पुणे वॉरियर्स (२०११-१३), कोलकाता नाईट रायडर्स (२०१४-१९) आणि राजस्थान रॉयल्स (२०२०) संघाकडून खेळला आहे. सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली असून त्याने ५ डावांमध्ये १६१ धावा केल्या आहेत.


हेही वाचा – राजस्थानने केली ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड


 

First Published on: January 22, 2021 4:25 PM
Exit mobile version