रोहित सतत विकेट्सचा विचार करतो – हरभजन

रोहित सतत विकेट्सचा विचार करतो – हरभजन

महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील दोन सर्वात यशस्वी कर्णधार मानले जातात. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने तीनदा, तर रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. ऑफस्पिनर हरभजन सिंगला या दोघांच्याही नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली असून या दोघांची नेतृत्व शैली काहीशी वेगळी आहे असे मत हरभजनने व्यक्त केले.

धोनी आपल्या गोलंदाजांना कशी गोलंदाजी करायची हे सांगत नाही. तुम्हाला जे चांगल्याप्रकारे माहित आहे, ते तुम्ही करा असे तो गोलंदाजांना सांगतो. तुम्ही जर सहाही चेंडू ऑफस्पिन टाकू शकता, तर ते करा. मात्र, तो कधीतरी यष्टींमागून किंवा षटक संपल्यानंतर गोलंदाजाला सल्ला देतो. ’हा फलंदाज असा फटका मारु शकेल’ असे तो सांगतो. परंतु, त्याला रोखण्यासाठी तू ठराविक चेंडू टाक असे तो गोलंदाजाला सांगून त्याला गोंधळात टाकत नाही, असे हरभजनने सांगितले.

रोहितच्या नेतृत्व शैलीचे वर्णन करताना हरभजन म्हणाला, रोहितही गोलंदाजांना मोकळीक देतो. मात्र, तो सतत विकेट्सचा विचार करतो. तो तुम्हाला हवी तशी गोलंदाजी करु देतो आणि क्षेत्ररक्षणाची आक्रमक रचनाही करतो. डावखुरा फलंदाज फलंदाजीला आल्यावर स्लिप असेलच असे नाही. तर कधीतरी तो दोन खेळाडू स्लिपमध्ये आणि एक खेळाडू शॉर्ट लेगवर ठेवतो. परंतु, हे दोघेही उत्कृष्ट कर्णधार आहेत.

First Published on: May 30, 2020 4:55 AM
Exit mobile version