रोहितच्या ओरड्यामुळे कामगिरी सुधारली – श्रेयस

रोहितच्या ओरड्यामुळे कामगिरी सुधारली – श्रेयस

श्रेयस अय्यर

बांगलादेशने भारताला चांगली झुंज दिली. जामठाच्या मैदानावर दव पडले होते. तसेच नागपूरच्या खेळपट्टीवर दुसर्‍यांदा फलंदाजी करणे जरा सोपे असते, असे उद्गार भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने तिसर्‍या टी-२० सामन्यानंतर काढले. भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. ही मालिका जिंकल्याचा आम्हाला आनंद आहे. टी-२० विश्वचषक आता वर्षभरावर आला असून आम्ही आता त्याची तयारी करत आहोत, असेही श्रेयसने नमूद केले.

भारताने तिसरा टी-२० सामना ३० धावांनी जिंकला. भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीला चांगली गोलंदाजी करता आली नाही. मात्र, कर्णधार रोहितने थोडा ओरडा दिल्याने आमची कामगिरी सुधारली, असेही श्रेयस म्हणाला. आमचा संघ दबावात होता. बांगलादेशचा संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये किती चांगला खेळतो हे आपण पाहिले आहे. आम्ही सुरुवातीला खराब गोलंदाजी केली. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर ठाण मांडल्यावर रोहितने आम्हाला थोडा ओरडा दिला. त्यामुळे आम्ही अधिक जिद्दीने खेळत कामगिरीत सुधारणा केली, असे श्रेयसने सांगितले.

भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज दीपक चहर (६ बळी) आणि शिवम दुबेने (३ बळी) महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचेही श्रेयसने कौतुक केले. दीपकने सुरुवातीला दोन आणि मधल्या षटकांत शिवम दुबेने सलग दोन गडी बाद केल्याने सामना आमच्या बाजूने फिरला, असे श्रेयस म्हणाला.

First Published on: November 12, 2019 5:14 AM
Exit mobile version