सचिन, द्रविड सरांचा सल्ला आला कामी

सचिन, द्रविड सरांचा सल्ला आला कामी

भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. मुंबईकर यशस्वीने या स्पर्धेच्या ६ सामन्यांत १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ४०० धावा चोपून काढल्या. त्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्यातच बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात इतर फलंदाज अपयशी ठरत असताना यशस्वीने एक बाजू लावून धरत ८८ धावांची खेळी केली. या सामन्यात सुरुवातीपासूनच बांगलादेशचे गोलंदाज शोरीफुल इस्लाम आणि तंझिम हसन शाकिब यांनी यशस्वीला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने संयम सोडला नाही. त्यावेळी त्याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या भारताच्या महान क्रिकेटपटूंनी दिलेला सल्ला कामी आला.

बांगलादेशचे गोलंदाज माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, द्रविड आणि सचिन सरांच्या सल्ल्यामुळे मी संयम राखू शकलो. तुझे तोंड नाही, तर तुझी बॅटच बोलली पाहिजे, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यांचा हा सल्ला मी कधीही विसरू शकत नाही. अंतिम सामन्यात मला दीर्घ काळासाठी फलंदाजी करत मोठी खेळी करायची होती. त्यावेळी मी फक्त याच गोष्टीचा विचार करत होतो. त्यामुळे गोलंदाज मला काहीही बोलले तरी मी हसत होतो, असे यशस्वी एका मुलाखतीत म्हणाला.

यशस्वी, अर्जुन तेंडुलकर मुंबई संघात!

यशस्वी जैस्वाल आणि अर्जुन तेंडुलकरची सीके नायडू २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील पुदुचेरीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यासाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे. हा सामना २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. रणजी मोसमाच्या अखेरच्या साखळी सामन्यात शतक करणारा सलामीवीर हार्दिक तामोरे या संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच या संघात सर्फराज खानचाही समावेश करण्यात आला आहे. सर्फराजने यंदाच्या रणजी मोसमात ६ सामन्यांत ९२८ धावा केल्या होत्या.

First Published on: February 19, 2020 1:32 AM
Exit mobile version