कोहली-रोहितपेक्षा सचिन-गांगुली सरस!

कोहली-रोहितपेक्षा सचिन-गांगुली सरस!

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांची सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. खासकरून या दोघांची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच या दोघांनी मिळून अनेकदा कठीण परिस्थितीत भारताला सामने जिंकवून दिले आहेत. मात्र, या दोघांपेक्षा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी अधिक दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध धावा केल्याने त्यांना झुकते माप द्यावे लागेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी व्यक्त केले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली आणि रोहितने फारच दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोघे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम दोन फलंदाज आहेत, असे काही लोक म्हणू शकतील. मात्र, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी १५ वर्षे जगभरातील गोलंदाजांना हैराण केले. त्यांनी बर्‍याचदा एकत्र सलामीला येताना अधिक दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या. पाकिस्तानचे वसीम अक्रम आणि वकार युनिस, वेस्ट इंडिजचे कर्टनी अँब्रोस आणि कर्टनी वॉल्श, ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅग्रा आणि ब्रेट ली, दक्षिण आफ्रिकेचे अ‍ॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉक, श्रीलंकेचे लसिथ मलिंगा आणि चमिंडा वास या दिग्गज गोलंदाजांचा सामना करणे आव्हानात्मक होते. त्यांच्याविरुद्ध खेळताना फलंदाजाच्या कौशल्याची खरी परीक्षा व्हायची, असे चॅपल म्हणाले.

तसेच त्यांनी पुढे सांगितले, सचिन आणि गांगुलीने कोणत्या गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या याचा विचार केल्यास त्यांना झुकते माप द्यावे लागेल. मात्र, तुम्ही कोहलीला सचिनइतके आणि रोहितला गांगुलीइतके सामने खेळण्याची संधी दिली, तर ते दोघे नक्कीच जास्त धावा करतील. कोहली आणि रोहितची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. कोहलीने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये ५० हूनही अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. या चौघांना बघण्याची संधी मिळाली, हे भारतीय चाहत्यांचे नशीब आहे, असेच म्हणावे लागेल.

First Published on: December 23, 2019 1:17 AM
Exit mobile version