IPL 2020 : चावला गोलंदाजीला आला अन् सॅमसन, स्मिथने त्याला धू, धू धुतला 

IPL 2020 : चावला गोलंदाजीला आला अन् सॅमसन, स्मिथने त्याला धू, धू धुतला 

संजू सॅमसन, पियुष चावला

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांना फारसा योग्य ठरवता आला नाही. दीपक चहरने राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला (६) स्वस्तात बाद केले खरे, पण त्यामुळे संजू सॅमसन मैदानात उतरला. त्याने आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने मिळून चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सॅमसनने सर्वच गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी केली, पण त्याने जर कोणत्या गोलंदाजाची सर्वाधिक धुलाई केली असेल, तर तो म्हणजे लेगस्पिनर पियुष चावला.

२ षटकांत तब्बल ४७ धावा 

धोनीने पियुष चावलाला आठव्या षटकात गोलंदाजी दिली. या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर सॅमसनने दोन षटकार लगावले. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर सॅमसन आणि स्मिथने प्रत्येकी एक धाव काढली. त्यामुळे सॅमसन पुन्हा स्ट्राईकवर आला आणि त्याने पुन्हा षटकार लगावला. दबावात आलेल्या चावलाने पुढचा चेंडू नो-बॉल टाकला आणि त्यामुळे राजस्थानला फ्री-हिट मिळाला. याचा स्मिथने पुरेपूर वापर करत षटकार ठोकला. सॅमसन आणि स्मिथने मिळून या षटकात तब्बल २८ धावा चोपून काढल्या. धोनीने मात्र चावलावर विश्वास दाखवत त्याला आणखी एक टाकण्याची संधी दिली. परंतु, कर्णधाराचा हा विश्वास चावलाला सार्थ ठरवता आला नाही. स्मिथने एक चौकार आणि एक षटकार, तर सॅमसनने आणखी एक षटकार लगावत चावलाच्या या षटकात १९ धावा फटकावल्या. त्यामुळे दहा षटकांतच राजस्थानची १ बाद ११९ अशी धावसंख्या झाली होती.

First Published on: September 22, 2020 8:53 PM
Exit mobile version