सानियाचा कोर्टला अलविदा; पुढच्या महिन्यात शेवटचा सामना

सानियाचा कोर्टला अलविदा; पुढच्या महिन्यात शेवटचा सामना

मुंबईः भारताची जगप्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने अखेर निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात दुबई येथे होणाऱ्या स्पर्धेत ती शेवटचा सामना खेळणार आहे. सानियाच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतासह जगभरात सानियाचे लाखो चाहते आहेत.

गेली २० वर्षे सानियाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दर्जेदार खेळीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कारकिर्दित सानियाला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मभूषण पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे. दुहेरी व एकेरी अशा सहा मोठ्या आंतरराष्ट्रीय पदकांवरही सानियाने आपली मोहोर उमटवली आहे. तिच्या अनेक स्पर्धेतील सामने रोमांचक होते.

१९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे. निवृत्तीनंतर ती तिच्या दुबई येथील टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. हैदराबाद येथेही सानियाची टेनिस अकादमी आहे.

निवृत्तीविषयी सानिया म्हणाली, गेल्या डब्ल्यूटीएच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्ती घेण्याचा विचार होता. पण उजव्या हाताच्य दुखापतीमुळे यूएस ओपन आणि उर्वरित स्पर्धेतून नाव मागे घ्यावे लागले. मी माझ्या अटींवर आयुष्य जगते. दुखापतीमुळे मला बाहेर पडायचे नाही. मी अजूनही प्रशिक्षण घेत आहे. दुबई टेनिस स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचेही हेच कारण आहे.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत २०१० मध्ये सानियाने विवाह केला. या जोडप्याला २०१८ मध्ये मुलगा झाला. हे दोघे दुबईत राहतात. मात्र काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु असल्याची चर्चा आहे. हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचेही वृत्त आहे. मात्र या घटस्फोटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी सानिया अनेकवेळा मैदानावर आली होती. भारत-पाकिस्तानचे सूर जुळत नसले तरी खेळाच्या मैदानावर फार कमी प्रमाणात वैर दिसले. सानिया व शोएबच्या विवाहाच्या आड भारत-पाकिस्तानचे संबंध आले नाहीत.

 

First Published on: January 7, 2023 12:22 PM
Exit mobile version