सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

फेडरेशन चषक सिनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सोमवारी पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ही स्पर्धा ८ मिनिटे २८.९४ सेकंदाच्या वेळेची नोंद करताना स्वतःच्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि चीनमध्ये होणार्‍या आशियाई चॅम्पियनशिप अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची पात्रता निश्चित केली. अविनाशने मागील वर्षी ८ मिनिटे २९.८० सेकंदाची वेळ नोंदवताना ३७ वर्षांपूर्वीचा गोपाळ सैनी यांचा विक्रम मोडला होता.

अविनाशसह १५०० मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सन, अजय कुमार सरोज आणि राहुल यांनीही आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले. १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जॉन्सनने ३ मिनिटे ४१.६७ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

अजय कुमार सरोजने ३ मिनिटे ४३.५७ सेकंदांत ही शर्यत पूर्ण करत रौप्य आणि राहुलने ३ मिनिटे ४४.९४ ची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना ही स्पर्धा ३ मिनिटे आणि ४६ सेकंदांच्या आत पूर्ण करणे गरजेचे होते आणि तसे या तिघांनी केले.

First Published on: March 19, 2019 4:38 AM
Exit mobile version