शमी कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होईल!

शमी कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होईल!

भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये येत्या शुक्रवारपासून डे-नाईट (विद्युतझोतात) कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. इतर देशांमध्ये कुकबुरा कंपनी हे गुलाबी चेंडू पुरवते, पण भारतात एसजी कंपनीचे गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहेत. या चेंडूबाबत बरीच चर्चा सुरु आहे. मात्र, भारतीय गोलंदाज नियमित लाल चेंडूप्रमाणेच गुलाबी चेंडूचा योग्य वापर करतील असा भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला विश्वास आहे. तसेच सध्या फॉर्मात असलेला मोहम्मद शमी कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होऊ शकतो, असे साहाला वाटते. शमीने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स मिळवल्या होत्या.

आमचे वेगवान गोलंदाज (शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव) सध्या ज्या फॉर्मात आहेत, ते पाहता, त्यांना गुलाबी चेंडू वापरताना अडचणी येतील असे वाटत नाही. खासकरून शमी कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होऊ शकतो. तो खूप वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याला चेंडू जुना झाल्यावर रिव्हर्स-स्विंग मिळतेच. गुलाबी चेंडू कशी हालचाल करत आहे हे अजून आम्हाला समजलेले नाही. मात्र, या चेंडूच्या रंगाचा आमच्या गोलंदाजांवर परिणाम होणार नाही, असे साहाने स्पष्ट केले.

तसेच साहाने पुढे सांगितले, चेंडूचा रंग वेगळा आहे. हा चेंडू वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे. तसेच या सामन्याला वेगळ्या वेळी सुरुवात होणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी चेंडू दिसताना अडचण येऊ शकेल. वेगवान गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. मात्र, फलंदाजांसाठी या सामन्यात चांगली कामगिरी करणे आव्हानात्मक असू शकेल. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ’साईट स्क्रीन’ ही काळ्या रंगाची असते. त्यामुळे डे-नाईट सामन्यात चेंडूची दिशा कळताना अडचण येत नाही. मात्र, या डे-नाईट कसोटी सामन्यात साईट स्क्रीन पांढर्‍या रंगाची असेल. त्यामुळे चेंडू दिसताना फलंदाजांसोबतच यष्टिरक्षकांनाही अडचण येऊ शकेल. मात्र, आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही.

First Published on: November 21, 2019 1:20 AM
Exit mobile version