सौरव गांगुलीचे अर्धशतकी पुनरागमन; संघ मात्र पराभूत  

सौरव गांगुलीचे अर्धशतकी पुनरागमन; संघ मात्र पराभूत  

सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना दिसला. बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या संघांमध्ये बुधवारी (आज) मैत्रीपूर्ण सामना झाला. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात जय शाह इलेव्हन संघाने सौरव गांगुली इलेव्हन संघाला २८ धावांनी पराभूत केले. डावखुऱ्या गांगुलीने या सामन्यात ३२ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. मात्र, त्याचे हे अर्धशतक संघाला सामना जिंकवून देण्यासाठी पुरेसे नव्हते.

१२-१२ षटकांच्या या सामन्यात जय शाह इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १२८ अशी धावसंख्या उभारली. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ३७ धावांची खेळी केली. त्याला सौराष्ट्रचा माजी कर्णधार जयदेव शाहने ३८ धावा करत चांगली साथ दिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना ६ चेंडूत केवळ २ धावा करता आल्या. शाह यांना गांगुलीने बाद केले.

१२८ धावांचा पाठलाग करणाऱ्या गांगुलीच्या संघाला १२ षटकांत ४ बाद १०० धावाच करता आल्या. गांगुलीने ३२ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या, पण त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. जय शाह यांना फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. गोलंदाजीत मात्र त्यांनी चमक दाखवत चार षटकांत ३९ धावांत २ विकेट घेतल्या. या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी या सामन्यात भारताच्या रेट्रो जर्सी परिधान केल्या.

 

First Published on: December 23, 2020 10:43 PM
Exit mobile version