शमीला वगळल्याचे आश्चर्य!

शमीला वगळल्याचे आश्चर्य!

मोहम्मद शमी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या विश्वचषकातील सुरुवातीच्या काही सामन्यांत संधी मिळाली नाही. मात्र, भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले आणि त्याने या संधीचा चांगला वापर केला. त्याने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ४-४, तर यजमान इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्स घेण्याची किमया केली. बांगलादेशविरुद्ध त्याला एकच विकेट मिळवण्यात यश आले.

त्याने या स्पर्धेत एकूण ४ सामन्यांत १४ गडी बाद केले आहेत. मात्र, इतके चांगले प्रदर्शन करूनही त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले नाही आणि याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, तसेच भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा यांना आश्चर्य वाटले.

गांगुलीने शमीला वगळण्याच्या कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याच्या मते शमी संघात असल्याचा भारताला फायदा झाला असता. गांगुलीशी सहमत असणारा आकाश चोप्रा म्हणाला, कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्याचा निर्णय योग्य होता. मात्र, शमीला संघातून वगळण्याचे कारण कळले नाही. फक्त पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणे धोकादायक ठरू शकते, पण पहिल्यांदा गोलंदाजी करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

क्रिकेट समीक्षक हर्षा भोगले शमीला वगळल्याबाबत म्हणाले, मी गांगुलीच्या मताशी सहमत आहे. मलाही शमी संघात स्थान न मिळाल्याचे आश्चर्य वाटले. तो सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेतो आणि त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांवर दबाव येत नाही. जाडेजा आठव्या क्रमांकावर खेळत असल्याने भारताच्या फलंदाजीची फळी अधिक मजबूत झाली आहे. मात्र, कुलदीप संघात नसल्याचे मला आश्चर्य वाटले, कारण त्याने याआधी न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.

First Published on: July 10, 2019 4:59 AM
Exit mobile version