T20 World Cup 2021: स्टीव्ह स्मिथ म्हणतो, भारत टी-२० विश्वचषक जेतेपदाचा प्रबळ दावेदार

T20 World Cup 2021: स्टीव्ह स्मिथ म्हणतो, भारत टी-२० विश्वचषक जेतेपदाचा प्रबळ दावेदार

भारताने टी-२० विश्वचषकासाठी चांगली तयारी केली आहे. भारताने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. भारताने दोन संघांना पराभूत केले जे या विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत. भारताने आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता, तर बुधवारी खेळलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथने भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय संघ हा विश्वचषक जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे, असे स्मिथला वाटते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात उत्कृष्ट सामना जिंकणारे खेळाडू आहेत, असे स्मिथने म्हटले आहे.

भारत एक दमदार संघ आहे. तसेच, संघाकडे विजय मिळवून देणारे खेळाडू आहेत. ते सर्व खेळाडू या वातावरणात आयपीएल खेळले. त्यांना या वातावरणाची सवय झालेली आहे. त्यामुळे भारतीय संघ हा टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असे मत स्मिथने व्यक्त केले. स्मिथने भारताविरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला पाच बाद १५२ पर्यंत पोहोचवण्यास मदत केली. भारताने ते लक्ष्य २ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

सलामीवीर रोहित शर्मा (६०) आणि केएल राहुलने (३९) शानदार सुरुवात केली. यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य १७.५ षटकांत पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद ३८ धावा केल्या. मधल्या फळीत त्याने चांगली फलंदाजी केली. त्यानंतर रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर त्याच्या जागी हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. त्याने १४ धावा केल्या.

वॉर्नरचा फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी मोठी चिंतेचे कारण बनले आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात आर अश्विनने वॉर्नरला एका धावेवर पायचित केले. खराब फलंदाजीमुळे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने वॉर्नला संघातून बाहेर काढले होते. वॉर्नरला त्याच्या शेवटच्या चार डावांमध्ये केवळ तीन धावा करता आल्या.

 

First Published on: October 21, 2021 6:58 PM
Exit mobile version