विराटचा कानमंत्र सार्थकी; के. एल. राहुलचे दमदार अर्धशतक

विराटचा कानमंत्र सार्थकी; के. एल. राहुलचे दमदार अर्धशतक

भारताचा आजचा सामना बांगलादेशविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर 184 धावांचे आव्हान ठेवले आहे. माजी कर्णधार विराट कोहली आणि संघाचा उपकर्णधार के. एल. राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 184 धावा केल्या. मात्र या सामन्यात के. एल. राहुलने केलेल्या अर्धशतकी खेळीवर विराट कोहलीचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यात विराट सातत्याने राहुलला कानमंत्र देताना दिसत होता. (t20 world cupIND vs BAN KL Rahul and Virat Kohli India Bangladesh)

आपली फ्लॉप खेळी सुधारण्यासाठी राहुलने सामन्यापूर्वी अनुभवी फलंदाज विराट कोहलीचे मार्गदर्शन घेतले होते. यावेळी के. एल. राहुल बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ सराव करताना दिसून आला. त्यावेळी विराट राहुलला त्याच्या फुटवर्क तसेच फटक्यांच्या निवडीबाबत मार्गदर्शन करत असल्याचेही दिसून आले.

प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा व के. एल राहुल यांनी जोरदार फटकेबाजी करत सामन्याला सुरूवात केली. मात्र मसुदने टाकलेल्या षटकात रोहित बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लोकेश राहुल व विराट कोहली याने दमदार फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली.

के. एल. राहुलने 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 50 धावांवर बाद झाला. विराटसह त्याने 67 धावांची भागीदारी केली. याशिवाय, टी-20 फलंदाजांच्या क्रमावारीत नंबर १ बनलेल्या सूर्यकुमार यादवने त्याचा तुफान फॉर्म कायम राखताना बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. सूर्यकुमार यादव 16 चेंडूंत 30 धावा करत माघारी परतला.

हार्दिक पांड्या 5 धावांवर बाद झाला. विराट व दिनेश कार्तिक यांच्याकडून अखेरच्या षटकांत मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती, परंतु दोघांमध्ये ताळमेळ चूकलेला पाहयला मिळाला. कार्तिक (7) रन आऊट झाला, त्यानंतर आलेला अक्षर पटेलही (7) लगेच माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही चांगली फटकेबाजी केली. विराट 44 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 64 धावांवर नाबाद राहिला.


हेही वाचा – विराटची रन-मशीन पुन्हा सुरू; ठरला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

First Published on: November 2, 2022 4:08 PM
Exit mobile version