Asian games 2018 : तजिंदर पाल सिंगला गोळाफेकमध्ये सुवर्ण 

Asian games 2018 : तजिंदर पाल सिंगला गोळाफेकमध्ये सुवर्ण 
 भारताचा गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर याने एशियाडमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्याने त्याच्या पाचव्या प्रयत्नात २०.७५ मीटर लांब गोळाफेक करून सुवर्ण पदक जिंकले. २०.७५ मीटर गोळाफेक केल्याने त्याने एशियाडमधील नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे भारताच्या खात्यात आता ७ सुवर्ण पदके जमा झाली आहेत.
पहिलाच प्रयत्न दमदार
तजिंदरने पहिल्या प्रयत्नात १९.९६ मीटर लांब गोळाफेक केला. त्यामुळे सुरूवातीलाच त्याला अव्वल स्थान मिळाले होते. त्याला चीनचा खेळाडू लिऊ यांगने टक्कर देण्याचा प्रयत्न केला. यांगने १९.५२ मीटर गोळाफेक केला. मात्र, त्या पुढच्याच प्रयत्नात तजिंदरने २०.७५ मीटरची विक्रमी फेक केली. त्यामुळे त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली. चीनच्या लिऊ यांगला रौप्य पदक मिळाले. तर कझाकिस्तानच्या इवान इव्हानोव्हने १९.४० मीटर गोळाफेकत कांस्य पदक पटकावले.   एशियाडच्या १९५१ ते आतापर्यंतच्या इतिहासात भारताला सर्वाधिक ९ सुवर्ण, ३ रौप्य आणि ७ कांस्य पदके गोळाफेकीत मिळालेली आहेत.
मोदींनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तजिंदरचे ट्विट करुन कौतुक करत तुझा देशाल अभिमान आहे, अशा आशयाचे ट्विट केले आहे.


स्क्वॉशपटू दिपीका पल्लिकल

स्क्वॉशमध्ये भारताला तिहेरी कांस्य

 एशियाडमध्ये भारताचे स्क्वॉशपटू दिपीका पल्लिकल, जोस्ना चिनप्पा आणि सौरव घोषाल या तिघांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. या तिघांनाही उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिघांनाही कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
 २०१४ एशियाडची कांस्य पदक विजेती दिपीका पल्लिकलला स्क्वॉश महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या निकोल डेविड हिने ११-७, ११-९, ११-६ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे दिपीकाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. डेविडने यापूर्वी चारवेळा एशियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यामुळे यावर्षीही तिलाच स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. तर जोस्ना चिनप्पा हिला उपांत्य फेरीत मलेशियाच्याच १९ वर्षीय सिवासांगारी सुब्रमण्यमने १२-१०, ११-६, ९-११, ११-७ असे पराभूत केले. त्यामुळे सुब्रमण्यमने पहिल्यांदाच एशियाडच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
स्क्वॉश पुरूष एकेरीत निराशा
स्क्वॉशच्या पुरूष एकेरीत भारताचा प्रमुख स्क्वॉशपटू सौरव घोषाल यालाही उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला हाँगकाँग-चीनच्या औ चुन मिंग याने १०-१२, ११-१३, ११-६, ११-५, ११-६ असे पराभूत केले. त्यामुळे त्याला कांस्य पदक मिळाले आहे. एशियाडमध्ये पदक मिळवण्याची सौरवची सहावी वेळ आहे. याआधी त्याने २००६ मध्ये एकेरीत कांस्य, २०१० मध्ये पुरूष एकेरी आणि दुहेरीत कांस्य, २०१४ मध्ये एकेरीत रौप्य आणि सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

सायना, सिंधू  एशियाडच्या उपांत्यपूर्व फेरीत

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू

भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी एशियाड बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर भारताची जोडी सात्विकराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.सिंधूने इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्का तुंजुंग हिचा २१-१२, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटची सिंधूने अप्रतिम सुरुवात केली. तिच्याकडे ८-१ अशी आघाडी होती. पण जॉर्जियाने सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सिंधूकडे ११-८ अशी अवघ्या ३ गुणांची आघाडी होती. पण मध्यंतरानंतर सिंधूने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत हा सेट २१-१२ असा जिंकला. तर दुसर्‍या सेटची सुरुवात पहिल्या सेटप्रमाणेच झाली. सिंधूने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्यामुळे या सेटच्या मध्यंतरापर्यंत सिंधुकडे ११-४ अशी आघाडी होती. पण मध्यंतरानंतर जॉर्जियाने सिंधूला चांगली टक्कर दिली. तरीही सिंधूने हा सेट २१-१५ असा जिंकला.

सायनाची दमदार कामगिरी

  दुसरीकडे सायना नेहवालने इंडोनेशियाच्याच फित्रीआनीला २१-६, २१-१४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या सेटला सायनाने अगदी सहजतेने जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्ये फित्रीआनीने सायनाला थोडा लढा दिला. पण सायनाने योग्य वेळी आपला खेळ उंचावत हा सेट २१-१४ असा जिंकला. तर भारताची जोडी सात्विकराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुरूष दुहेरीत कोरियाच्या चोई सोलग्यू आणि मिन ह्युक कांग या जोडीने १७-२१, २१-१४, १७-२१ असा पराभव केला.


First Published on: August 26, 2018 2:25 AM
Exit mobile version