टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक ?

टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक ?

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक प्रशिक्षकांचे करार इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषकानंतर संपणार आहेत. या प्रशिक्षकांच्या करारामध्ये मुदतवाढीचा पर्याय नाही. त्यामुळे शास्त्रीच पुन्हा प्रशिक्षक होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, भारतीय संघाच्या कामगिरीवर खुश असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यकांच्या करारात वाढ करण्याचा आग्रह काही दिवसांपूर्वी प्रशासकीय समितीने धरला होता, पण आता जरी बीसीसीआयला शास्त्री यांनाच प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याची इच्छा असली तरी त्यांना नव्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रियाच राबवावी लागेल.

बीसीसीआयने अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षक असल्यापासून करारामध्ये मुदतवाढीचा पर्याय काढून टाकला. त्यामुळे भारताने शास्त्रींच्या मार्गदर्शनात विश्वचषक जरी जिंकला तरी त्यांना पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी नव्याने अर्ज भरावा लागेल. मात्र, ते आधीचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांना थेट शॉर्ट लिस्टमध्ये प्रवेश मिळेल, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले आहे.

शास्त्री यांच्यासह गोलंदाज प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांचाही करार जुलै महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत शास्त्री यांच्या कराराच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे विश्वचषकानंतर नवीन प्रशिक्षक निवडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विश्वचषकानंतर बीसीसीआय या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर काही दिवसांत सुरू होणार्‍या वेस्ट इंडिज दौर्‍यापूर्वी भारताच्या प्रशिक्षकाची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, शास्त्रीच पुन्हा प्रशिक्षक होण्याची दाट शक्यता आहे, असेही बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले.

First Published on: March 22, 2019 4:23 AM
Exit mobile version