जे नियमात होते, तेच केले!

जे नियमात होते, तेच केले!

Ravichandran Ashwin

राजस्थान रॉयल्सचा पराभव करत किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलची विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात पंजाबने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची एकेवेळी १ बाद १०८ अशी अवस्था होती. त्यांचा सलामीवीर जॉस बटलर ६९ धावांवर खेळत होता. मात्र, राजस्थानच्या डावातील १२ वे षटक पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन टाकत होता. या षटकातील पाचवा चेंडू टाकण्याआधी अश्विन थांबला आणि नॉन-स्ट्रायकर बटलरने क्रिज सोडल्यावर अश्विनने चेंडू न टाकता त्याला धावचीत केले. ज्याला ‘मंकडींग’ असे म्हणतात. अश्विनने अशाप्रकारे धावचीत केले हे बटलरला फारसे आवडले नाही आणि मैदानातच त्याच्यात व अश्विनमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, सामन्यानंतर अश्विनने आपल्या कृत्याचे समर्थन केले.

मला त्या क्षणी जे योग्य वाटले, ते मी केले. मी असे करणार आहे याचा आधीपासून विचार केला नव्हता. मी जे केले ते खेळाच्या नियमात होते. त्यामुळे मला कळतच नाही की यात खेळाडूवृत्ती वैगेरेचा प्रश्न येतोच कुठे. जे नियमात बसते ते करणे साहजिकपणे योग्यच आहे, असे अश्विन म्हणाला. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यामधील १९८७ विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानच्या डावातील अखेरच्या षटकात नॉन-स्ट्रायकर असलेला सलीम जाफर क्रिजबाहेर असूनही विंडीजचा गोलंदाज कॉर्टनी वॉल्शने त्याला धावचीत केले नाही. त्यावेळी वॉल्शने जी खेळाडूवृत्ती दाखवली तशी तू का दाखवली नाहीस असे विचारले असता अश्विन म्हणाला, जर एखादी गोष्ट नियमात बसणारी असेल तर खेळाडूवृत्तीचा मुद्दा येतोच कुठे. सर्वांना एकच नियम लागू होऊ शकत नाही. त्या (१९८७ च्या) सामन्यात जॉस बटलर खेळत नव्हता किंवा मीही खेळत नव्हतो. त्यामुळे दोन घटनांची आणि व्यक्तींची तुलना करणे योग्य आहे असे मला वाटत नाही.

बटलरची अशाप्रकारे बाद होण्याची ही पहिली वेळ नव्हती. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऑफस्पिनर सचित्र सेनानायकेने त्याला अशाप्रकारेच धावचीत केले होते. मात्र, त्यावेळी सेनानायकेने बटलरला दोनवेळा ताकीद दिली होती. तसेच २०१२ मध्ये अश्विनने श्रीलंकेचा फलंदाज लाहिरू थिरिमन्नेला अशाप्रकारेच धावचीत करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळचा भारतीय कर्णधार विरेंद्र सेहवागने अपील मागे घेतली होती.

मंकडींग म्हणजे काय ?

क्रिकेटमध्ये जेव्हा गोलंदाज नॉन-स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाला चेंडू टाकण्याआधी क्रिज सोडली म्हणून धावचीत करतो, त्याला मंकडींग असे म्हणतात. १९४७ मध्ये सिडनी येथे झालेल्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान भारताच्या विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या नॉन-स्ट्राईकवर असलेल्या बिल ब्राऊन यांना चेंडू टाकण्याआधी क्रिज सोडल्यामुळे धावचीत केले होते. मंकड यांनी ब्राऊन यांना आधी ताकीद दिली होती. मात्र, ब्राऊननी तरीही क्रिज सोडल्यामुळे मंकड यांनी त्यांना धावचीत केले, पण हे ऑस्ट्रेलियन चाहते आणि मीडियाला फारसे आवडले नव्हते. त्यामुळे मंकड यांच्यावर बरीच टीका झाली होती. अशाप्रकारे फलंदाजाला धावचीत करणे हे खेळाच्या नियमात बसत असले तरी ते खेळाडूवृत्तीच्या विरोधात आहे, असे अनेकांचे मत आहे.

नियम काय सांगतो ?

क्रिकेटच्या ४१.१६ नियमानुसार नॉन-स्ट्राईकवर असलेला फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकल्याशिवाय क्रिज सोडून शकत नाही. जर फलंदाजाने क्रिज सोडली असेल तर गोलंदाज त्याला धावचीत करू शकतो.

First Published on: March 27, 2019 4:49 AM
Exit mobile version