फ्रान्स, इंग्लंडचा मोठा विजय

फ्रान्स, इंग्लंडचा मोठा विजय

UEFA European Championships

युवा खेळाडू किलियन एम्बापेच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर विश्वविजेत्या फ्रान्स फुटबॉल संघाने युएफा युरो पात्रता फेरीत आइसलँडचा ४-० असा पराभव केला. तसेच दुसर्‍या गटात इंग्लंडने माँटेनेग्रोवर ५-१ अशी मात केली. या दोन्ही संघांचा हा सलग दुसरा विजय होता.

गट ‘एच’मधील आइसलँडविरुद्धच्या सामन्याची फ्रान्सने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला किलियन एम्बापेच्या पासवर सॅम्युएल उमटीटीने गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. यानंतर आइसलँडने सामन्यात चांगले पुनरागमन केले. खासकरून त्यांच्या बचावफळीने आपला खेळ उंचावल्यामुळे फ्रान्सला मध्यांतराआधी दुसरा गोल करता आला नाही. मध्यांतरानंतर मात्र फ्रान्सने अधिकच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना गोल करण्याच्या संधी निर्माण झाल्या. अशाच एका संधीचे गोलमध्ये रूपांतर करत ऑलिव्हीयर जिरुडने फ्रान्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ७८ व्या मिनिटाला अ‍ॅटोन ग्रीझमनच्या पासवर एम्बापेने फ्रान्सचा तिसरा तर ८४ व्या मिनिटाला एम्बापेच्या पासवर ग्रीझमनने फ्रान्सचा चौथा गोल केला.

गट ‘ए’ मधील माँटेनेग्रोविरुद्धच्या सामन्याची इंग्लंडसाठी सुरुवात चांगली झाली नाही. १७ व्या मिनिटाला मार्को वेसोवीचने गोल करत माँटेनेग्रोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ३० व्या मिनिटाला इंग्लंडला फ्री-किक मिळाली. रॉस बार्कलीच्या पासवर मायकल किनने गोल करत इंग्लंडला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर ३८ आणि ५९ व्या मिनिटाला बार्कलीने गोल करत इंग्लंडला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुढे ७१ व्या मिनिटाला हॅरी केनने इंग्लंडचा चौथा गोल केला, तर आधीच्या सामन्यात हॅट्ट्रिक करणार्‍या रहीम स्टर्लिंगने गोल करत इंग्लंडला ५-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत राखत इंग्लंडने हा सामना जिंकला.

First Published on: March 27, 2019 4:08 AM
Exit mobile version