कसोटीतील सलामीवीरांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही!

कसोटीतील सलामीवीरांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही!

Vikram Rathore

भारतीय कसोटी संघातील सलामीवीरांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही, असे विधान भारताचे नवे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या सलामीवीरांना सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौर्‍यात मयांक अगरवालने केवळ एक अर्धशतक झळकावले, तर त्याचा सलामीचा साथी लोकेश राहुलने पुन्हा एकदा निराशाजनक प्रदर्शन केले. त्याला २ सामन्यांतील ४ डावांत मिळून १०१ धावाच करता आल्या. युवा सलामीवीर पृथ्वी शॉने मागील वर्षी विंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १ शतक आणि १ अर्धशतक लगावले होते. मात्र, उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे सध्या त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर म्हणून कोण खेळणार हा प्रश्न भारतासमोर आहे. तसेच एकदिवसीय संघातील मधल्या फळीच्या कामगिरीवरही अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे राठोड यांना वाटते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताच्या मधल्या फळीला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आम्हाला त्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीरांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याकडे (भारत) सलामीवीरांचे पर्याय उपलब्ध आहेत आणि या जागेसाठी स्पर्धाही आहे. मात्र, ज्या खेळाडूंना संधी मिळेल, त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे, असे राठोड म्हणाले.

राठोड यांची काही दिवसांपूर्वीच संजय बांगर यांच्या जागी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाली. राठोड याआधी राष्ट्रीय निवड समितीचे सदस्यही होते. त्यामुळे ते भारतीय संघातील खेळाडूंना आधीपासून ओळखतात. त्याविषयी राठोड यांनी सांगितले, मी याआधी निवड समितीचा सदस्य होतो. त्यामुळे मी इतर प्रशिक्षक आणि खेळाडूंना आधीपासून ओळखतो. मी याआधीही रवी शास्त्री, भारत अरुण, श्रीधर आणि विराट कोहलीसोबत काम केले आहे. याचा मला आता फायदा होईल.

अय्यरमध्ये खूप प्रतिभा!
भारताच्या एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा मोठा प्रश्न होता. मात्र, मुंबईकर श्रेयस अय्यरने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत सलग दोन अर्धशतके लगावली होती. तो यापुढेही अशी कामगिरी करत राहील, असे विक्रम राठोड यांना वाटते. ते म्हणाले, अय्यरने मागील काही सामन्यांत उत्तम कामगिरी केली. तसेच आपल्याकडे मनीष पांडेचाही पर्याय आहे. या दोन फलंदाजांनी स्थानिक क्रिकेट आणि भारत ‘अ’ संघाकडून दमदार कामगिरी केली आहे. हे दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप पाडतील याची मला खात्री आहे. त्यांना थोडा वेळ देण्याची गरज आहे. या दोघांमध्येही खूप प्रतिभा आहे.

First Published on: September 7, 2019 2:06 AM
Exit mobile version