प्रमाणित चेंडूची काही गरज नाही

प्रमाणित चेंडूची काही गरज नाही

सुनील गावस्करचे मत

इंग्लंडमधील प्रचलित मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीने कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय बनवण्यासाठी आयसीसीला काही शिफारसी केल्या होत्या. यातील एक शिफारस होती की विशचषकानंतर सुरू होणार्‍या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच कंपनीचा म्हणजेच प्रमाणित चेंडू वापरण्यात यावा. मात्र, एमसीसीची ही शिफारस भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांना फारशी आवडलेली नाही. फक्त चेंडूच कशाला सर्वकाही प्रमाणित करा, असे गावस्कर म्हणाले.

एमसीसी कसोटी क्रिकेटमध्ये प्रमाणित चेंडू वापरण्याबाबत बोलत आहे. फक्त चेंडूच कशाला, तुम्ही खेळपट्ट्या, बॅट सगळे काही प्रमाणित करा. क्रिकेट खेळायचा उपयोगच काय? परदेशात जाऊन कसोटी जिंकायला खूप महत्त्व दिले जाते. ते कशासाठी, तर तुम्ही परदेशात वेगळ्या परिस्थितीमध्ये खेळत असता. क्रिकेटची संकल्पनाच विविध परिस्थितीमध्ये खेळण्यावर आधारित आहे. तुम्हाला देश ते देश किंवा शहर ते शहरच नाही तर गल्ली-गल्लीमध्ये वेगवेगळी परिस्थिती मिळते. एखाद्या गल्लीमध्ये तुम्ही सरळ फटका मारू शकत नाही कारण तिथे पोलीस उभे असतील. मात्र, दुसर्‍या गल्लीमध्ये समोर कोणीही नसल्याने तुम्ही सरळ फटका मारू शकता. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट प्रमाणित करू शकत नाही. एकदा खेळाडू किती चांगला आहे हे तो परदेशात, अपरिचित परिस्थितीत खेळल्यावरच तुम्हाला समजते, असे गावस्करांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, एमसीसीची जागतिक समिती ही क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) किंवा चेन्नईमधील मद्रास क्रिकेट क्लबप्रमाणेच आहे. मात्र, त्यांना असे वाटते की आयसीसीच्या समितीपेक्षाही त्यांचे जास्त ऐकले पाहिजे आणि दुर्दैवाने काही लोक त्यांना महत्त्व देत आहेत.

First Published on: March 15, 2019 4:17 AM
Exit mobile version