यंदा सलामीवीर म्हणून खेळणार!

यंदा सलामीवीर म्हणून खेळणार!

Rohit Sharma

आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा भारतीय संघासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळत असला तरी आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळणे त्याने मागील काही वर्षे टाळले आहे. त्याला सलामीवीर म्हणून खेळायला आवडत असले तरी मुंबईच्या मधल्या फळीत अनुभवी फलंदाजांची कमतरता असल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आहे. मागील वर्षी पहिल्या २ सामन्यांत सलामीवीर म्हणून खेळल्यानंतर त्याने चौथ्या क्रमांकावर खेळण्याला पसंती दिली. मात्र, मागील आयपीएलमध्ये १४ सामन्यांत त्याला अवघ्या २८६ धावाच करता आल्या. यंदा मात्र त्याला चांगली कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी तो संपूर्ण मोसम सलामीवीर म्हणून खेळण्यास तयार आहे.
यावर्षी मी सर्व सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळणार आहे हे नक्की. आयपीएलनंतर होणारा विश्वचषक हेसुद्धा या निर्णयामागचे एक कारण आहे, पण मी भारतासाठी कोणत्या क्रमांकावर खेळतो हे प्रामुख्याने लक्षात घेत आहे. मला सलामीवीर म्हणून यश मिळाले आहे आणि संघाला याची कल्पना आहे. आमच्याकडे आता मधल्या फळीत खेळण्यासाठी काही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे मी सलामीला येऊ शकतो. याच तो मोसम आहे, जेव्हा मी सर्व सामन्यांत सलामीवीर म्हणून खेळणार आहे, असे रोहित म्हणाला.

मधल्या फळीतील अनुभवी खेळाडूंमध्ये युवराज सिंगचाही समावेश आहे. युवराजबाबत मुंबई इंडियन्सचा संचालक झहीर खान म्हणाला, लिलावाच्या आधी आम्ही चर्चा केली होती आणि आम्हाला मधल्या फळीत अनुभवी फलंदाजाची गरज आहे असे आम्हाला कळले होते. रोहितला सलामीवीर म्हणून खेळायचे आहे. त्यामुळे आम्हाला दुसरा अनुभवी फलंदाज शोधण्याची गरज होती आणि युवराजपेक्षा चांगला पर्याय कुठे मिळणार. युवराज नेट्समध्ये खूप चांगली फलंदाजी करत आहे आणि तो संघात असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याला या मोसमात चांगली कामगिरी करायची आहे. ही त्याच्या आणि मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

First Published on: March 20, 2019 4:10 AM
Exit mobile version