यंदा टी-२० वर्ल्डकप अवघड!

यंदा टी-२० वर्ल्डकप अवघड!

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक जैव-सुरक्षित वातावरणात आयोजित करावा लागेल. परंतु, १६ संघांना या वातावरणात ठेवणे शक्य नसल्याने यंदा टी-२० विश्वचषक होणे अवघड असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी सांगितले. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. परंतु, करोनामुळे ऑस्ट्रेलियात प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परदेशी नागरिकांना ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी नाही. त्यामुळे ही स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या स्पर्धेबाबत निर्णय जुलैनंतर घेणार आहे. परंतु, पीसीबी अध्यक्ष मणी यांना ही स्पर्धा होणे अवघड वाटत आहे.

यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा पार पडणार असेल, तर ती जैव-सुरक्षित वातावरणात झाली पाहिजे. या वातावरणात दोन संघांना ठेवणे शक्य आहे. परंतु, टी-२० विश्वचषकात १२-१६ संघ सहभागी होणार आहेत आणि इतक्या संघांना या वातावरणात ठेवणे शक्य नाही. त्यामुळे टी-२० विश्वचषकच काय, तर यावर्षी आयसीसीची कोणतीही स्पर्धा होणे अवघड आहे, असे मणी म्हणाले.

यंदाचा टी-२० विश्वचषक पुढील वर्षी होऊ शकेल असेही मणी यांना वाटते. २०२०, २०२१ आणि २०२३ मध्ये आयसीसीचे विश्वचषक होणार आहेत. २०२२ मध्ये मात्र आयसीसीची कोणतीही स्पर्धा नाही. त्यामुळे यंदाचा टी-२० विश्वचषक पुढील वर्षी होऊ शकेल आणि पुढील वर्षी भारतात होणारा टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आयोजित करता येईल. मात्र, अजून कोणताही निर्णय झालेला नसून विविध पर्यायांचा विचार होत आहे, असे मणी यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 19, 2020 5:38 AM
Exit mobile version