Tokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमारचे विक्रमी पदार्पण; उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश

Tokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमारचे विक्रमी पदार्पण; उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश

बॉक्सर सतीश कुमारचे विक्रमी पदार्पण; उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश

भारताचा बॉक्सर सतीश कुमारला टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. सतीशचे हे ऑलिम्पिक पदार्पण ठरले. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ९१ किलोवरील वजनी गटात खेळणारा सतीश हा भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला. त्याने पदार्पणाच्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. त्यामुळे आता तो पदकापासून केवळ एक विजय दूर आहे. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या या दोन खेळाडूंच्या लढतीत सतीश कुमारने ४-१ अशी बाजी मारली. आशियाई स्पर्धांमधील दोन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सतीशला दोन जखमाही झाल्या. मात्र, त्यानंतरही त्याला विजय मिळवण्यात यश आले.

उपांत्यपूर्व फेरीत जालोलोव्हशी सामना

उपांत्यपूर्व फेरीत सतीशचा सामना जागतिक आणि आशियाई स्पर्धांमधील गतविजेत्या उझबेकिस्तानच्या बखोदिर जालोलोव्हशी सामना होईल. या सामन्यात जालोलोव्हचे पारडे जड मानले जात आहे. परंतु, त्याला पराभूत करणे अशक्य नसल्याचे भारताचे प्रशिक्षक सॅंटियागो निएवा म्हणाले. ‘जालोलोव्हला पराभूत करणे अशक्य नाही. सतीशला याआधी त्याच्याविरुद्ध सामना जिंकण्यात यश आलेले नाही. मात्र, या दोघांमधील मागील सामना इंडिया ओपनमध्ये झाला होता. या सामन्यात सतीशने जालोलोव्हला झुंज दिली होती,’ असे निएवा यांनी सांगितले.

First Published on: July 29, 2021 3:10 PM
Exit mobile version