Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन द्या; IOC अध्यक्षांचे जपानी नागरिकांना आवाहन

Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन द्या; IOC अध्यक्षांचे जपानी नागरिकांना आवाहन

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच

टोकियो ऑलिम्पिकला आता एका आठवड्याहूनही कमी कालावधी शिल्लक असतानाच शनिवारी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (क्रीडानगरी) कोरोनाचा शिरकाव झाला. एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जपानी आयोजकांकडून देण्यात आली. त्यामुळे आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (IOC) चिंता वाढली आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमधील कोरोनाचा संसर्ग वाढू शकेल अशी भीती याआधीच नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बहुतांश स्थानिक नागरिकांचा ऑलिम्पिकला विरोध होता. आता हा विरोध पुन्हा वाढण्याची भीती आहे. परंतु, ऑलिम्पिकला विरोध न करता खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी जपानी नागरिकांना केले आहे.

ऑलिम्पिकमुळे धोका वाढणार नाही

खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप मेहनत घेतात. ऑलिम्पिक ही खेळाडूंच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची स्पर्धा असते. त्यामुळे या खेळाडूंचे स्वागत करा, त्यांना प्रोत्साहन द्या असे आवाहन मी जपानी नागरिकांना करू इच्छितो, असे बॅच म्हणाले. तसेच ऑलिम्पिकमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही याची त्यांना खात्री असून जगात सर्वाधिक निर्बंध पाळत होणारी ही स्पर्धा असल्याचे त्यांनी म्हटले.

…तर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश

शनिवारी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडणे ही आयओसीसाठी चिंतेची बाब आहे. परंतु, जुलै महिन्यात जपानमध्ये दाखल झालेल्या १५ हजार जणांपैकी केवळ १५ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे बॅच यांनी सांगितले. तसेच टोकियोतील कोरोनाच्या स्थितीत सुधारणा झाल्यास मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची तयारी असल्याचेही बॅच म्हणाले.

First Published on: July 17, 2021 9:42 PM
Exit mobile version