Tokyo Olympics : जपानची १३ वर्षीय मोमिजी निशिया ठरली पहिलीवहिली स्केटबोर्डिंग चॅम्पियन!

Tokyo Olympics : जपानची १३ वर्षीय मोमिजी निशिया ठरली पहिलीवहिली स्केटबोर्डिंग चॅम्पियन!

मोमिजी निशिया ठरली पहिलीवहिली स्केटबोर्डिंग चॅम्पियन

जपानच्या १३ वर्षीय मोमिजी निशियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. निशियाने महिलांच्या स्केटबोर्डिंग प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान पटकावला. तसेच १३ वर्षे आणि ३३० दिवस वय असलेली निशिया ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील सर्वात युवा सुवर्णपदक विजेत्यांपैकी एक ठरली. निशियाने ब्राझीलच्या १३ वर्षीय रायसा लील आणि जपानच्या १६ वर्षीय फुना नाकायामाला मागे टाकत हे सुवर्णपदक जिंकले. ब्राझीलच्या रायसा लीलला विक्रम रचण्याची संधी होती. १३ वर्षे आणि २०३ दिवस असे वय असलेली लील ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील सर्वात युवा सुवर्णपदक विजेती ठरू शकली असती. परंतु, तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 १५.२६ गुणांसह पटकावले सुवर्णपदक

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये यंदा चार नव्या खेळांचा समावेश करण्यात आला असून स्केटबोर्डिंग याच खेळांपैकी एक आहे. त्यामुळे निशिया ऑलिम्पिक स्पर्धांमधील स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिलीच खेळाडू ठरली. तिने ट्रिक्स विभागात १५.२६ गुणांची कमाई करत हे सुवर्णपदक जिंकले. तिच्याआधी पुरुष गटात जपानच्याच युटो होरीगोमेने सुवर्ण कामगिरी केली होती.

First Published on: July 26, 2021 12:14 PM
Exit mobile version