Tokyo Olympics : लॉरेल हबार्ड न्यूझीलंडच्या महिला वेटलिफ्टिंग संघात; ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू

Tokyo Olympics : लॉरेल हबार्ड न्यूझीलंडच्या महिला वेटलिफ्टिंग संघात; ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू

लॉरेल हबार्ड न्यूझीलंडच्या महिला वेटलिफ्टिंग संघात; ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू   

आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तृतीयपंथी लॉरेल हबार्डची न्यूझीलंडच्या महिला वेटलिफ्टिंग संघात निवड झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी हबार्ड ही पहिली तृतीयपंथी खेळाडू ठरणार आहे. ४३ वर्षीय हबार्ड महिलांच्या ८७ किलोवरील वजनी गटात सहभाग घेईल. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने (एनझेडओसी) याबाबतची माहिती दिली. हबार्डने यापूर्वी २०१३ सालापर्यंत पुरुषांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. ‘न्यूझीलंडच्या लोकांनी मला पाठिंबा दिल्याने मी त्यांची आभारी आहे’, असे हबार्डने सांगितले. तसेच ‘हबार्डची ऑलिम्पिकसाठी न्यूझीलंडच्या वेटलिफ्टिंग संघात निवड होणे हा खेळांसाठी आणि न्यूझीलंड संघासाठी ऐतिहासिक क्षण आहे,’ असेएनझेडओसीच्या अध्यक्ष केरेन स्मिथ म्हणाल्या.

२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत घेतलेला भाग

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) कोणत्याही तृतीयपंथी खेळाडूला महिला म्हणून स्पर्धेत भाग घेण्यासाठी परवानगी देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यामुळे २०१५ पासून हबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास पात्र ठरली आहे. हबबार्डने २०१७ च्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक आणि सामोआ येथील २०१९ च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतही भाग घेतला होता.

सर्व नियमांची पूर्तता केली

हबार्डला न्यूझीलंड सरकारनेही पाठिंबा दर्शवला आहे. ‘आम्हाला सर्व खेळाडूंप्रमाणेच हबार्डचा अभिमान आहे आणि आम्ही तिला कायम पाठिंबा देऊ,’ असे न्यूझीलंडच्या क्रीडामंत्री ग्रांट रॉबर्टसन म्हणाले. ‘ऑलिम्पिकमध्ये तृतीयपंथी खेळाडूंना महिला गटात खेळू देण्याबाबत सध्या बरीच चर्चा होत असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. परंतु, हबार्डने सर्व नियमांची पूर्तता केली आहे,’ असे केरेन स्मिथ यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 22, 2021 10:41 PM
Exit mobile version