UEFA EURO : इटलीची विजयी सलामी; तुर्कीचा केला ३-० असा पराभव      

UEFA EURO : इटलीची विजयी सलामी; तुर्कीचा केला ३-० असा पराभव      

इटलीकडून लोरेंझो इंसिंयेने गोल केला           

इटलीने युरो २०२० फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. रोमच्या स्टाडिओ ऑलिम्पिको मैदानावर झालेल्या गट ‘अ’मधील सलामीच्या सामन्यात इटलीने तुर्कीचा ३-० असा पराभव केला. इटलीला २०१८ फिफा वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यात अपयश आले होते. परंतु, त्यानंतर प्रशिक्षक रोबेर्तो मॅनचिनी यांच्या मार्गदर्शनात इटलीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इटलीचा संघ मागील २८ सामन्यांत अपराजित आहे. तुर्कीला पुन्हा एकदा युरो स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चांगला खेळ करण्यात अपयश आले. युरो स्पर्धेचा सलामीचा सामना गमावण्याची ही तुर्कीची सलग पाचवी वेळ ठरली.

डेमिरालचा स्वयं गोल

या लढतीत पूर्वार्धात तुर्कीने इटलीला चांगली झुंज दिली. तुर्कीने बचावात्मक खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा भक्कम बचाव भेदण्यात इटलीला अपयश आले. उत्तरार्धात मात्र इटलीच्या आक्रमणाला धार आली. याचा फायदा त्यांना ५३ व्या मिनिटाला मिळाला. मेरिह डेमिरालच्या स्वयं गोलमुळे इटलीला सामन्यात १-० अशी आघाडी मिळाली.

इटलीचा आक्रमक खेळ 

पुढेही त्यांनी आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. ६६ व्या मिनिटाला स्ट्रायकर चिरो इमोबिलेने गोल करत इटलीची आघाडी दुप्पट केले. तर ७९ व्या मिनिटाला लोरेंझो इंसिंयेने केलेल्या गोलमुळे इटलीने हा सामना ३-० असा जिंकला. इटलीचा पुढील सामना स्वित्झर्लंडविरुद्ध, तर तुर्कीचा पुढील सामना वेल्सविरुद्ध होईल.

First Published on: June 12, 2021 8:19 PM
Exit mobile version