ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम अकरात स्थानासाठी उमेश प्रबळ दावेदार – विराट कोहली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम अकरात स्थानासाठी उमेश प्रबळ दावेदार – विराट कोहली

उमेश यादव-विराट कोहली (सौ-IBTimes)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने १० विकेट घेतल्या. या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या रूपात भारताकडे दुसरा वेगवान गोलंदाज होता. पण तो अवघे १० चेंडू टाकूनच दुखापतग्रस्त झाल्याने उमेश हा एकटाच वेगवान गोलंदाज भारताकडे राहिला होता. उमेशने अप्रतिम प्रदर्शन करत वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ४ विकेट घेतल्या. त्यामुळे कर्णधार विराट कोहली खुश झाला आहे. तसेच त्याने उमेश हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या अंतिम अकरात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

उमेशच्या वेग आणि फिटनेसचा फायदा

इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत उमेश भारतीय संघात होता. मात्र, त्याला या मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. पण आता उमेश ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्वाची भूमिका बजावू शकेल असे कोहलीचे मत आहे. उमेशविषयी विराट कोहली म्हणाला, “विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत केलेले प्रदर्शन हे उमेशच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो महत्वाची भूमिका बजावेल. कारण ऑस्ट्रेलियातील खेळपट्या आणि वातावरण हे इंग्लंडसारखे नसते. ऑस्ट्रेलियात बॉल स्विंग होत नाही. त्यामुळे गोलंदाजांना आपल्या वेगाने फलंदाजाला बाद करावे लागते. त्यासाठी गोलंदाजाकडे पूर्ण दिवस वेगाने गोलंदाजी करायची क्षमता असली पाहिजे आणि ती उमेशकडे आहे. तो १४० हून अधिक वेगाने गोलंदाजी टाकतो.”
First Published on: October 15, 2018 5:47 PM
Exit mobile version