खेलरत्न पुरस्कारासाठी कोहली, चानू यांच्या नावाची शिफारस

खेलरत्न पुरस्कारासाठी कोहली, चानू यांच्या नावाची शिफारस

सौजन्य - ESPN

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी  खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याआधी पुरस्काराच्या शर्यतीत होता. पण विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने त्याला मागे टाकले.

खेळातील सर्वोच्च पुरस्कार

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा खेळातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागील चार वर्षांतील अप्रतिम कामगिरीसाठी दिला जातो. जर कोहलीला खेलरत्न पुरस्कार मिळाला तर हा पुरस्कार जिंकणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल. याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (१९९७) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२००७) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

कोहलीचे अप्रतिम प्रदर्शन

विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. तो सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने अप्रतिम प्रदर्शन केले होते. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. कोहलीला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

विश्वविजेती मीराबाई चानू

वेटलिफ्टर मीराबाई चानूने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. २०१७ मध्ये मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत विश्‍वविक्रम केला होता. तिने ४८ किलो वजनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती अवघी दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली होती. तसेच २०२० ऑलिम्पिकमध्ये तिला पदक मिळवण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
First Published on: September 17, 2018 7:01 PM
Exit mobile version