फुटबॉल, टेनिसमधील यश भारतीयांसाठी शेकडो मैल दूर

फुटबॉल, टेनिसमधील यश भारतीयांसाठी शेकडो मैल दूर

विम्बल्डन

सध्या क्रीडाप्रेमींसारखं सुखी कुणी असेल असे वाटत नाही. विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, क्रिकेटचे भारतासकट इतर देशांचेही सामने, महत्त्वाच्या बॅडमिंटन स्पर्धा आणि अखिल इंग्लंड अर्थात विम्बल्डन टेनिस स्पर्धा सुरू आहेत. किती पाहू या दोन डोळ्यांनी? अशी त्यांची अवस्था झालीय. शक्य तितकं ते आपल्या स्मृतिकोषात साठवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात यात मोठ्या प्रमाणात भारतीयांचाही समावेश आहे, हे सगळे सांगायला नकोच.विश्वचषक फुटबॉल सामन्यांतील बाकी देशांच्या खेळाने ते भारावून गेले असले, तरी नेहमीप्रमाणे आपले खेळाडू या पातळीपर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे. रशियाप्रमाणे यजमानपद मिळवलं तरच ते शक्य आहे. पण, नजिकच्या भविष्यातील स्थळे आधीच निश्चित झाल्याने ती बाब तूर्त तरी विसरायलाच हवी. तोवर ते सामने मनापासून पाहायचे आणि दाद द्यायचे काम मात्र चालूच राहील हे नक्की.क्रिकेट आणि भारत हे आता वेगवेगळे राहिलेच नसल्याने टी-२० सामने, एकदिवसीय असोत वा कसोटी सामने दिवस-रात्र कोणतीही वेळ असो क्रिकेटप्रेमी ती चुकू देत नाहीत. प्रत्यक्ष दूरचित्रवाणीवर पाहता आले नाहीत, तर आकाशवाणीवरून समालोचन ऐकतात. नंतर वर्तमानपत्रे वाचून त्यावर घनघोर चर्चाही करतात. आता थोड्या प्रमाणात का होईना माजी खेळाडू प्रकाश पडुकोन, गोपीचंद नंतर सायना आणि सिंधू, श्रीकांत आणि प्रणॉय इ. खेळाडूंमुळे बॅडमिंटनची लोकप्रियताही वाढते आहे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांना त्या सामन्यांची दखल घेणेही भाग पडत आहे.

विम्बल्डन सोमवारी २ जुलैला सुरू झाले. हा बदल चटकन जाणवला नाही. तो या सार्‍या सामन्यांच्या गर्दीमुळे. कारण विम्बल्डन म्हटलं की, सुरुवात जूनच्या तिसर्‍या आठवड्यात सोमवारी होणार ही शतकापेक्षाही जास्त काळची परंपरा आणि तिचा रास्त अभिमानही संयोजकांना होता. पण गेल्या वर्षीपासून ती तारीख पुढे नेण्यात आली आणि विम्बल्डन जुलैच्या पहिल्या सोमवारी सुरू करण्याचे ठरले. याचे कारण असे की, २०१६ मध्ये जागतिक टेनिस फेडरेशनने खुल्या फ्रेंच स्पर्धेनंतर दोन आठवड्यांतच विम्बल्डन सुरू न करता ती तीन आठवड्यांनंतर करावी, असा निर्णय, खेळाडूंना पुरेशी विश्रांती आणि क्ले कोर्टनंतर एकदम हिरवळीच्या कोर्टवर खेळण्यासाठी थोडा काळ तरी सराव करता यावा, म्हणून घेतला आणि त्याचीच अंमलबजावणी आता होत आहे.

अर्थात स्पर्धा उशिरा सुरू झाली तरी विम्बल्डन ते विम्बल्डन, हे खरेच. टेनिसशी त्याचे अद्वैतच आहे. कोणत्याही टेनिसपटूचे तेथे खेळणे हे स्वप्नच असते आणि बोर्ग, मॅकेन्रो, बेकर, सॅम्प्रस यांसारख्या अद्वितीय खेळाडूंना ते आपलेच अंगण वाटत असे, सेरेना विल्यम्सप्रमाणेच. गेल्या काही वर्षांंत टेनिसमधील चुरस खूपच वाढली आहे. तरीही फेडरर, नदाल, जोकोविच आणि काही प्रमाणात मरे यांची छाप प्रकर्षाने जाणवते. त्यातही पहिल्या दोघांची जास्तच. त्यांच्यातील चुरस बोर्ग मॅकेन्रोची आठवण करून देणारी. पण एक मोठा फरक आहे. बोर्ग मॅकेन्रोच्या वेळी बाकी खेळाडू, एखादा अपवाद वगळता एक पायरी खालीच असायचे.

सध्याची स्थिती वेगळी आहे. आता पहिले किमान दहा खेळाडू असे आहेत, की ते कधीही कोणालाही हरवू शकतात. पण वस्तूस्थिती मात्र अशी आहे की, प्रत्यक्षात ग्रँड स्लॅम मालिकेतील बड्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत मात्र एखादा अपवाद वगळता, आधी सांगितलेले चौघेच आढळतात. त्यातही फेडरर, नदाल यांचे वर्चस्व असे की गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून या फ्रेंच स्पर्धेपर्यंत त्यांनी अन्य कोणालाही विजेतेपद मिळू दिलेले नाही. यंदा तर फेडरर ग्रँड स्लॅम मालिकेच्या सामन्यांतील विक्रमी २१ वे विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात तर नदाल १८ वे विजेतेपद मिळवून दोघांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. सेरेना विल्यम्सही हे विजेतेपद मिळवून आपले २४ वे जेतेपद मिळवण्याच्या व त्याबरोबरच सुपरमॉम ठरण्याच्या प्रयत्नात आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच काही मोहरे गारद झाले आहेत, विश्वचषक फुटबॉलमध्येही तेच झाले होते. प्रश्न एकच आहे की, एकेरीत भारताला रामनाथन कृष्णन, विजय अमृतराज, रमेश कृष्णन, पेस यांच्यासारखा खरे तर यांच्यासारखे, अव्वल खेळाडू मिळण्यासाठी आणखी किती वाट बघावी लागेल?


– आ. श्री. केतकर

First Published on: July 9, 2018 8:32 PM
Exit mobile version