WI vs AUS : विंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; प्रमुख फलंदाजाला स्थान नाही

WI vs AUS : विंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; प्रमुख फलंदाजाला स्थान नाही

मार्नस लबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या २३ सदस्यीय प्राथमिक संघाची घोषणा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या प्रवासावरील निर्बंधांमुळे प्रमुख फलंदाज मार्नस लबूशेन या मालिकेला मुकणार आहे. लबूशेन सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असून त्याला मायदेशी परतल्यास क्वारंटाईन व्हावे लागेल. त्यामुळे त्याचा विंडीज दौऱ्यासाठी विचार केला नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. ऑस्ट्रेलियन संघ विंडीज दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अ‍ॅरॉन फिंच या मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

वॉर्नर, स्मिथचे पुनरागमन 

स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर या स्टार फलंदाजांसह प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. मार्चमध्ये झालेल्या न्यूझीलंड दौऱ्याला हे तिघेही मुकले होते. त्यांची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली होती. परंतु, कोरोनामुळे ही कसोटी मालिका पुढे रद्द करण्यात आली होती.

दौऱ्याला मुकावे लागणार असल्याचे दुःख

लबूशेन मात्र विंडीज दौऱ्याला मुकणार आहे. ‘लबूशेनला जे लोक ओळखतात, त्यांना माहिती आहे की तो ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काहीही करू शकतो. सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला या दौऱ्याला मुकावे लागणार असल्याचे दुःख आहे. आम्ही त्याच्याशी चर्चा केली. अखेर त्याने इंग्लंडमध्येच थांबून कौंटी क्रिकेट खेळत राहावे या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा प्राथमिक संघ : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन एगर, जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मोईसेस हेन्रिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रायली मेरेडीच, जॉश फिलिपे (यष्टीरक्षक), जाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तन्वीर संघा, डार्सी शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वॅपसन, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, अ‍ॅडम झॅम्पा.

First Published on: May 17, 2021 8:29 PM
Exit mobile version