विजयाची मालिका राखण्याचे लक्ष्य!

विजयाची मालिका राखण्याचे लक्ष्य!

गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने महिला टी-२० विश्वचषकाची दिमाखात सुरुवात केली. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास वाढला असून आता सोमवारी होणार्‍या दुसर्‍या सामन्यात त्यांच्यासमोर बांगलादेशचे आव्हान असेल. या दोन संघांमध्ये झालेल्या मागील पाच सामन्यांपैकी ३ सामने भारताने आणि २ सामने बांगलादेशने जिंकले आहेत. हरमनप्रीत कौरच्या संघाला पर्थमध्ये होणारा सामना जिंकण्यात यश आल्यास त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर होईल.

अ गटातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात १६ वर्षीय शेफाली वर्माने १५ चेंडूत २९ धावांची खेळी करत भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. ती बाद झाल्यानंतर भारताच्या धावांचा वेग मंदावला. स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीतला फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. परंतु, जेमिमा रॉड्रिग्स (३३ चेंडूत २६) आणि दिप्ती शर्मा (४६ चेंडूत नाबाद ४९) यांनी १-२ धावांवर भर देत भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारताने २० षटकांत ४ बाद १३२ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. अनुभवी खेळाडूंना अपयश आल्यानंतर युवा खेळाडूंनी संयमाने खेळ केल्याचा हरमनप्रीतला आनंद झाला. पूर्वी आम्ही दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून होतो, पण आता चित्र बदलले आहे, असे हरमनप्रीतने नमूद केले.

१३३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची चांगली सुरुवात झाली होती. मात्र, लेगस्पिनर पूनम यादवने ४ बळी घेत त्यांच्या डावाला खिंडार पाडले. तिला वेगवान गोलंदाज शिखा पांडेने ३ मोहरे टिपत उत्तम साथ दिली. आता भारताला विजयाची मालिका सुरु ठेवायची असल्यास या दोघींना बांगलादेशविरुद्ध अशीच कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे बांगलादेशची भिस्त फलंदाज फर्गना हक आणि अष्टपैलू जहानारा आलमवर असेल. २६ वर्षीय हकच्या नावे आंतरराष्ट्रीय टी-२० शतक आहे. त्यामुळे तिला रोखणे भारतासाठी महत्त्वाचे असेल.

सामन्याची वेळ : दुपारी ४:३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

First Published on: February 24, 2020 5:19 AM
Exit mobile version