विश्वचषकाचे योद्धे

विश्वचषकाचे योद्धे

पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघातील २-३ खेळाडू वगळता इतर खेळाडू कोण असणार हे जवळपास निश्चित होते. महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त दुसरा यष्टीरक्षक कोण असणार, हा निवड समितीपुढे सर्वात कठीण प्रश्न होता. अखेर याचे उत्तर मिळालेच.

निवड समितीने युवा रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला पसंती दिली आहे. ’हा निर्णय आमच्यासाठी कठीण होता. पण, शेवटी या दोघांपैकी कार्तिक हा अधिक दर्जेदार यष्टीरक्षक असल्याने आम्ही त्याला या संघात स्थान दिले’, असे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद संघाची घोषणा करताना म्हणाले.या संघात फलंदाज अंबाती रायडूलाही स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी अष्टपैलू विजय शंकरची निवड झाली आहे.

शंकरने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दोन एकदिवसीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. याचाच त्याला फायदा झाला. या विश्वचषकात १० संघांचा सहभाग आहे. प्रत्येक संघ सर्वच संघांशी सामने खेळणार आहे. भारताचा या विश्वचषकातील पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

First Published on: April 16, 2019 4:03 AM
Exit mobile version