मेरीसह चौघींचे सुवर्णपदकाचे लक्ष्य

मेरीसह चौघींचे सुवर्णपदकाचे लक्ष्य

मेरी कोम

रशियात सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत चार भारतीय बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. मागील स्पर्धेतही भारताला चार पदके मिळाली होती. मात्र, यावेळी मेरी कोमसह चार जणींचे सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य आहे. ५१ किलो वजनी गटातील तिसर्‍या सीडेड मेरी कोमने गुरुवारी आपला सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे तिने या स्पर्धेतील आपले विक्रमी आठवे पदकही निश्चित केले.

परंतु, तिला कांस्यपदकावर समाधान मानायचे नाही. तिला जागतिक स्पर्धेत आपले सातवे सुवर्णपदक मिळवायचे आहे. शनिवारी होणार्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिच्यासमोर तुर्कीच्या युरोपियन स्पर्धा विजेत्या बुसेनाझ साकिरोग्लूचे आव्हान आहे. बुसेनाझला या स्पर्धेत दुसरे सिडींग मिळाले आहे. त्यामुळे एशियाड आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मेरीला अंतिम फेरी गाठण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

दुसरीकडे मंजू राणी (४८ किलो) आणि जमुना बोरो (५४ किलो) या भारतीय बॉक्सर्सनी पहिल्यांदा जागतिक स्पर्धेत खेळताना उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच मागील स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्‍या लोव्हलीना बोर्गोहेनलाही (६९ किलो) यावेळी आपल्या पदकाचा रंग बदलण्याची संधी मिळणार आहे. मेरीप्रमाणेच या तिघींचेही उपांत्य फेरीतील सामने शनिवारी होणार आहे.

या चौघींबाबत भारताचे प्रशिक्षक मोहम्मद अली कमार म्हणाले, चौघीनींही या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला आहे. आता त्या अंतिम फेरीत पोहचू शकतील, अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही कांस्यपदकावर समाधान मानू शकत नाही. आमच्या बॉक्सर्सनी केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. २०१८ सालच्या या स्पर्धेनंतर आमच्या बॉक्सर्सनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु, त्यांना आपली कामगिरी उंचावता आली नाही, याची खंत आहे. आमच्या सहा जणी उपांत्य फेरी गाठू शकल्या असत्या, पण दोन जणी चुरशीच्या सामन्यात हरल्या.

First Published on: October 12, 2019 5:31 AM
Exit mobile version