बजरंग ऑलिम्पिकसाठी पात्र

बजरंग ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. बजरंगप्रमाणेच रवी दहियानेही उपांत्य फेरी गाठत आपले ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. परंतु, गुरुवारीच झालेल्या उपांत्य फेरीमध्ये या दोन्ही कुस्तीपटूंना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शुक्रवारी त्यांना कांस्यपदकासाठी होणार्‍या लढतीत खेळावे लागेल.

बजरंगला ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या दौलेत नियाझ्बेकोव्हने पराभूत केले. या सामन्यात बजरंग २-९ असा पिछाडीवर पडला होता. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत ९-९ अशी बरोबरी केली, पण अखेर त्याचा पराभव झाला. त्याआधीच्या सामन्यांमध्ये बजरंगने प्रतिस्पर्ध्यांना सहज धूळ चारली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने कोरियाच्या जॉन्ग चोई सॉनवर ८-१ अशी मात केली.

त्यामुळे २०१८ साली बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा बजरंग यावेळी सुवर्णपदक पटकावणार असे वाटत होते. मात्र, त्याला उपांत्य फेरीत आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. भारताकडून याआधी केवळ सुशील कुमारनेच जागतिक कुस्ती स्पर्धेत (२०१०, मॉस्को) सुवर्णपदक मिळवले आहे.

५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रवी दहियाचा रशियाच्या झऊर युगुएव्हने ४-६ असा पराभव केला. मात्र, त्याआधीच्या सामन्यांमध्ये रवीने संयमाने खेळ करत अनुभवी कुस्तीपटूंचा पराभव केला, ज्यात एका माजी युरोपियन विजेत्या आणि एका जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असणार्‍या कुस्तीपटूचा समावेश होता.

साक्षी पहिल्याच फेरीत पराभूत

भारताच्या साक्षी मलिकचा जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाला. रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या साक्षीला नायजेरियाच्या अमिनत अदेनियिने ७-१० असे पराभूत केले. अमिनतने उपांत्यपूर्व फेरीतील सामना गमावल्यामुळे साक्षीला स्पर्धेबाहेर जावे लागले. तसेच ६८ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत दिव्या काकरनवर जपानच्या सारा डोशोने ०-२ अशी मात केली.

First Published on: September 20, 2019 5:39 AM
Exit mobile version